नवरात्रोत्सवात नागरीकांना करावा लागतोय धुळीचा सामना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : शहरातील रस्ते खड्डेमय असल्यामुळे व सध्या पावसाने उसंत दिली असल्यामुळे नवरात्रोत्सवात नागरीकांची गर्दी होत आहे. मात्र शहरात नागरीकांना फिरताना सध्या धुळीचा प्रचंड सामना करावा लागत असून अनेकांना श्वसनाचा त्रास जाणवत आहे.
गडचिरोली शहरातील चारही मार्गांवर तसेच अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. काही दिवसांपूर्वी मुरूम टाकून खड्डे बुजविण्यात आले. यामुळे पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य होते. तर आता पावसाने विश्रांती घेतल्यामुळे आता मार्गांवर धुळीचा सामना नागरीकांना करावा लागत आहे. चामोर्शी मार्गावरील कात्रटवार काॅम्प्लेक्स येथे रास गरबाचे आयोजन करण्यात येत आहे. यामुळे या ठिकाणी नागरीकांची गर्दी उसळते. मात्र या मार्गाने वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ राहत असल्यामुळे धुळीमुळे मार्गच दिसेनासा होतो. तसेच मार्गाने आवागमन करणाऱ्या नागरीकांना धुळीचा त्रास होत आहे. यामुळे अनेकांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
News - Gadchiroli | Posted : 2019-10-06