मतदान केंद्रावर किमान सुविधा उपलब्ध कराव्या : मूख्य निवडणूक निरीक्षक राजेश सिंग राणा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा  :
मतदान केंद्रावर देण्यात येणाऱ्या किमान सुविधांबाबत ऐनवेळी कोणत्याही तक्रारी येऊ नये यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी  मतदानाच्या एक दिवस पूर्वीच संपूर्ण तयारी पूर्ण  करावी. यामध्ये प्रामुख्याने पिण्याचे पाणी, दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प, व्हील चेअर, वीज पुरवठा, शौचालय, मतदान केंद्र इमारत डागडुजी, पावसाची शक्यता लक्षात घेता पेंडॉल याबाबत योग्य नियोजन करण्याच्या सूचना मुख्य  निवडणूक निरीक्षक राजेश सिंग राणा यांनी दिल्यात.
जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी सर्व नोडल अधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांचा निवडणुकीच्या तयारीबाबत आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी एम जे प्रदीप चंद्रन, निवासी उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, निवडणुक निर्णय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, मनीषा दांडगे, नितीन सदगीर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोदवड, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बनसोड,शिक्षणाधिकारी पाच्छापुरे, सूचना व विज्ञान  अधिकारी संदीप लोखंडे, उपमुख्यकार्यकरी अधिकारी मंजुषा ठवकर, स्वीप नोडल अधिकारी मृणालिनी भूत, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त आशा कवाडे, सी व्हिजिल तक्रार निवारण केंद्राचे नोडल अधिकारी श्री गवळी, खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम, उपस्थित होते.
काही मतदान केंद्रावर जाण्यासाठी रस्ता नसल्यास मतदान टक्केवारी कमी होऊ नये, यासाठी रस्त्यांची तात्पुरती डागडुजी करून घेण्यात यावी. मतदारांनी मतदान करावे यासाठी जिल्हा प्रशासनाने  मतदान जनजागृतीसाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्रात मोठे कार्यक्रम घ्यावेत. नवमतदार ,महिला यांना मतदानासाठी प्रोत्साहित करावे. यासाठी सोशल मीडियाचा वापर करावा. व्हीव्हीपॅटबाबत नागरिकांच्या मनात शंका राहू नये, यासाठी त्याचे प्रात्यक्षिक लोकांना दाखवावे. तसेच मतदान यादीसंदर्भातील तक्रारींचे तात्काळ निराकरण करावे.

मतदार चिठ्यांचे वाटप बीएलओ मार्फत

मतदारांना पाच दिवस आधी मतदार चिठ्यांचे वाटप करावे. चुकूनही कोणत्याही राजकीय पक्षाचे प्रतिनिधी किंवा इतर व्यक्तिमार्फत चिठ्यांचे वाटप  करण्यात येऊ नये. केवळ मतदान केंद्र अधिकारी किंवा अधिकृत व्यक्तींकडूनच मतदान चिठ्यांचे वाटप होईल, याबाबत काळजी घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्यात. मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांनाही मतदान करता येते याबाबत पुरेशी जनजागृती करावी. त्यासाठी 11 ओळखपत्रांची यादी  जारी करावी.
आचारसंहिते बाबत काय काळजी घ्यावी याबाबत  आधीच राजकीय पक्ष आणि उमेदवारांना अवगत करावे. प्रचार रॅली, भाषण, प्रचार सभ यामध्ये आचारसंहिता भंग होऊ नये यासाठी त्यांना माहिती द्यावी. तसेच रॅली, प्रचार सभेला परवानगी देणे किंवा नाकारणे याबाबत सर्वांना समान न्याय दयावा.

स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेबाबत काळजी घ्यावी

तीनही विधानसभा क्षेत्रात मतदान यंत्र ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूमच्या ठिकाणी सी सी टी व्ही, अखंडित वीज पुरवठा, आणि सुरक्षा रक्षक यांची नेमणूक करावी. तेथील खिडक्या, दारे योग्य प्रकारे बंद करावेत. सी व्हिजिल अँप वर येणाऱ्या तक्रारींला तात्काळ प्रतिसाद मिळेल अशी व्यवस्था करावी. भरारी पथक योग्य प्रकारे काम करतात की नाही याबाबत चाचणी घेण्यात यावी. शेवटच्या आठवड्यात मद्य आणि पैशाची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते त्यामुळे, भरारी पथक, नाका पथक आणि स्थायी पथकाने डोळ्यात तेल घालून काम करावे.

मतदान केंद्र पथकासाठी आरोग्य सुविधा

मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर काम करणाऱ्या पथकातील अधिकारी, कर्मचारी यांच्यावरील कामाचा ताण बघता त्यांच्यासाठी प्रथमोपचार सुविधा ठेवाव्यात. तसेच काही अघटित घटना झाल्यास तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध होईल याची व्यवस्था करावी असेही निरीक्षक राजेश सिंग राणा यांनी सांगितले.  Print


News - Bhandara | Posted : 2019-10-06


Related Photos