नागपूर येथे सतरा वर्षीय विद्यार्थ्याची हत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधि / नागपूर  : 
मस्कऱ्या गणपतीच्या मिरवणुकीदरम्यान डीजेवर नाचताना झालेल्या वादातून सतरावर्षीय विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली. नवीन कामठीतील पावनगाव परिसरात संतोषी माता लेआउट येथे बुधवारी आढळलेल्या अनोळखी मुलाची ओळख पटली असून, विद्यार्थ्याच्या वर्ग मित्रांनीच त्याची हत्या केल्याचा संशय आहे. पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
खुशाल ऊर्फ कौस्तुभ दामोधर सवई (वय १७, रा. अम्बेनगर, पारडी) असे मृताचे नाव आहे. तो मुनियार कॉलेजमध्ये विज्ञान शाखेच्या प्रथम वर्षाला शिकत होता. मिळालेल्या माहितीनुसार, २९ सप्टेंबरला खुशाल हा त्याच्या दोन मित्रांसह बाहेर गेला. त्यानंतर तो घरी परतला नाही. त्याच्या वडिलांनी पारडी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, बुधवारी सायंकाळी पावनगाव भागात कुजलेल्या स्थितीत मुलाचा मृतदेह आढळला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. गुरुवारी सकाळी खुशाल याचे वडील दामोदर व अन्य नातेवाइक मेयो हॉस्पिटलमध्ये पोहोचले. सॅण्डल व पॅन्टवरून नातेवाइकांनी मृतक खुशाल असल्याचे सांगितले. खुशाल हा दोन मित्रांसोबत गेला होता, असेही दामोदर यांनी पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी खुशालच्या दोन अल्पवयीन मित्रांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. दोघांनी दगडाने ठेचून त्याची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. डीजेवर नाचण्याचा वादातून की अन्य कारणाने खुशालची हत्या करण्यात आली, याचा शोध पोलिस घेत आहेत. उशिरा रात्रीपर्यंत हत्येचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही.

   Print


News - Nagpur | Posted : 2019-10-05


Related Photos