महत्वाच्या बातम्या

 निवडणूक जुमला : नागरिकत्व सुधारणा कायदा लागू 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : देशात नागरिकत्व सुधारणा अर्थात सीएए कायदा लागू करण्याचा वटहुकूम भाजप सरकारने आज अचानक जारी केला असून मध्यरात्रीपासूनच हा कायदा लागू झाला आहे.

या कायद्यामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून आलेल्या मुस्लिमेतर स्थलांतरितांना हिंदुस्थानचे नागरिकत्व देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्य म्हणजे २०१९ मध्ये हा कायदा संमत झाल्यानंतर देशातील विविध राज्यांतून तीव्र विरोध झाला. त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी लांबली होती.

डिसेंबर २०१९ मध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहात नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर झाले आणि त्याचे कायद्यात रूपांतर झाले. मात्र देशातील भाजपेतर राज्यांतून कायद्याला तीव्र विरोध झाला. कायद्याच्या विरोधात झालेली निदर्शने तसेच पोलीस कारवाईत किमान १०० जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे हा कायदा थंड बस्त्यात होता. मात्र, आता निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकारने हा कायदा रेटला आहे.

धार्मिक छळामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीन देशांमधून ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी हिंदुस्थानच्या आश्रयाला आलेल्या हिंदू, बौद्ध, जैन, शीख, पारशी आणि ख्रिश्चन या सहा धार्मिक अल्पसंख्याकांना आता थेट नागरिकत्व मिळणार आहे.

सध्या हिंदुस्थानचे नागरिकत्व मिळवण्यासाठी कुठल्याही व्यक्तीला येथे किमान ११ वर्षे वास्तव्य आवश्यक आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्यात ही अट शिथील होऊन सहा वर्षांवर येणार आहे.

कायदा लागू करण्यासाठी आणि अंमलबजावणीसाठी एक विशेष पोर्टल तयार करण्यात आले असून नागरिकत्व नोंदणी पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यासाठी कागदोपत्री पुरावे लागणार नाहीत.





  Print






News - World




Related Photos