दारू तस्करीचे वाहन पोलिसांच्या अंगावर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना ५ वर्ष सश्रम कारावास


- १ लाख ६  हजारांचा दंडही ठोठावला
- गडचिरोली येथील प्रमुख सत्र न्यायाधिश स्वप्नील खटी यांचा निर्णय
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली  :
दारू तस्करांना अटकाव करण्याच्या प्रयत्नात असलेल्या पोलिस पथकावर वाहन घालून जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना गडचिरोली येथील प्रमुख सत्र न्यायाधिश स्वप्नील खटी यांनी ५  वर्ष सश्रम कारावास आणि १ लाख ६ हजारांचा दंड ठोठावला आहे.
आरोपी बबलू सचिन राॅय रा. राममोहनपूर ता. चामोर्शी, वसंत मारोती भोयर रा. बोरी भिक्सी ता. चामोर्शी अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
१८ फेब्रुवारी २०११ रोजी रात्री १  वाजताच्या सुमारास पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार टाटा सुमो आणि महिंद्रा मॅक्स वाहनांमध्ये दारू भरून मेंढा मार्गाने चामोर्शीकडे आणल्या जात होते. पोलिस पथक दबा धरून बसले असताना सदर वाहने आरोपींनी पोलिसांच्या अंगावर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये काही पोलिस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले.  तसेच पोलिसांच्या वाहनाचे ४० हजारांचे नुकसान झाले. 
सदर आरोपी पळून जात असताना पोलिसांनी पकडून वाहनाची तपासणी केली. टाटा सुमो क्रमांक एमएच १२ ए २५१८ ही बबलु सचिन राॅय रा. राममोहनपूर याची होती तर वसंत मारोती भोयर रा. बोरी हा सोबत होता. दुसरे वाहन महिंद्रा मॅक्स क्रमांक एमएच ३३ ए १५७४ शंकर सुखदेव राॅय याची होती. दोन्ही वानांमध्ये देशी - विदेशी दारूच्या ६४ पेट्या आढळून आल्या. या प्रकरणी बबलु सचिन राॅय रा. राममोहनपूर, वसंत मारोती भोयर रा. बोरी भिक्सी, शंकर सुखदेव राॅय रा. भिक्सी माल, हरीदास विजय राउत नेहरू वार्ड क्रमांक १ गडचिरोली, चंद्रय्या भुमय्या गड्डमवार रा. कुरूड ता. चामोर्शी, अमित लक्ष्मण गोटीपर्तीवार रा. जयरामपूर, हरीदास दाजीबा शेट्टीवार रा. कुरूड, प्रकाश उध्दव चिचोडकर रा. जैरामपूर, धर्मेश रविशंकर जैस्वाल रा. अर्जूनी मोरगाव जि. गोंदिया या आरोपींना अटक करून गडचिरोली पोलिस ठाण्यात कलम ३०७, ३५३, १४३, १४८, १४९, ४२७ तसेच ६५ (इ) ८३ , ९८ (२)  महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. 
गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक जी. व्ही. पलंगे यांनी करून आरोपींविरोधात सबळ पुराव्याच्या आधारे न्यायालयात प्रकरण दाखल केले.  प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश स्वप्नील खटी यांनी साक्ष पुरावा तपासून जिल्हा सरकारी वकील अनिल प्रधान तसेच सहाय्यक सरकारी वकील निळकंठ भांडेकर यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपी बबलू सचिन राॅय रा. राममोहनपूर ता. चामोर्शी, वसंत मारोती भोयर रा. बोरी भिक्सी ता. चामोर्शी यांना दोषी ठरवून कलम ३०७ मध्ये प्रत्येकी ५ वर्ष सश्रम कारावास व १ हजार रूपये दंड ठोठावला. कलम ३५३ भादंविमध्ये प्रत्येकी २ वर्ष कारावास व ५०० रूपये दंड, कलम १४३ भादंविमध्ये प्रत्येकी ६ महिने कारावास तसेच ५०० रूपये दंड, कलम १४८ भादंविमध्ये प्रत्येकी ३ वर्ष कारावास व ५०० रूपये दंड तसेच ६५ (ई), महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार प्रत्येकी ३ वर्ष कारावास व २५ हजार रूपये दंड, ८३ महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार प्रत्येकी ३  वर्ष कारावास व २५ हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. 
गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक जी.व्ही. पलंगे यांनी केला. पोलिस निरीक्षक प्रकाश तुंकलवार यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.  

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-05


Related Photos