महत्वाच्या बातम्या

 बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थांकडून अर्ज आमंत्रित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : जिल्हा शल्य चिकित्सक यांचेमार्फत तीन लक्ष रुपयापर्यंतची कंत्राटी स्वरुपाची कामे नुतनीकरण करण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राद्वारे गठीत केलेल्या काम वाटप समितीकडे प्राप्त झाली आहे. ही कामे करण्यास इच्छुक असणाऱ्यांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राद्वारे स्थापन झालेल्या पात्र बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थांनी २२ मार्च पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज सायंकाळी ६ वाजेपर्यंत सादर करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त निता औघड यांनी केले आहे.

कंत्राटी स्वरुपाची कामे स्वीकारतेवेळी कामाच्या स्वरुपाप्रमाणे व आवश्यकतेनुसार परवाने असणे आवश्यक आहे. बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थांची कमीत कमी ६ महिने पुर्वीची नोंदणी आवश्यक असून संस्था कार्यरत असावी. अर्जासोबत संस्था नोंदणी प्रमाणपत्र सोबत जोडणे आवश्यक आहे. आर्थिक चालू वर्षाचे अंकेक्षण अहवालाची, वार्षिक लेखा परिक्षणाची व बॅलन्सशीट सत्यप्रत जोडावी. अद्ययावत बँक पासबुकची सर्व प्रपत्रांची सत्यप्रत जोडावी. संस्थेमध्ये ११ पेक्षा कमी सदस्य असू नये. 

संस्थेमध्ये हयात असलेल्या सर्व संस्था अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष व सदस्यांची चालू असलेले नुतनीकरण केलेले सेवायोजन कार्ड जोडणे आवश्यक असून जोडलेले एम्पलायमेंट कार्ड संस्थेतील आजीव सदस्यांचेच आहे, असे प्रमाणपत्र जिल्हा निबंधक, उपनिबंधक व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था याचे कार्यालयाकडून प्राप्त करुन घ्यावे. संस्थेने  जिल्हा निबंधक, उपनिबंधक व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालायाकडून कार्यरत संस्था ब्लॅकलिस्ट मध्ये नसल्याबाबतचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. ज्या संस्थांनी यापूर्वी कामे केली आहेत, अशा संस्थांनी कार्यालय प्रमुखांकडून कामे समाधानकारक केले असल्याचे प्रमाणपत्र सही शिक्क्यासह जोडावे. तसेच पात्र संस्थांची निवड करण्यासाठी व कामवाटप समितीमार्फत कामे मिळविण्यासाठी अटी व शर्तीची पुर्तता करणे आवश्यक आहे.

विहित मुदतीनंतर प्राप्त प्रस्ताव स्वीकारण्यात येणार नाही तसेच प्रस्ताव सादर केल्यानंतर काम मिळेलच असे गृहीत धरु नये. काम वाटप व नियोजन समितीव्दारे मंजूर जेष्ठता यादीनुसार केले जाते, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त निता औघड यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos