असे शोधा मतदार यादीत आपले नाव !


- वेबसाईट , मोबाईल ॲप ,  टोल फ्री क्रमांक व मदत केंद्राची व्यवस्था 

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकांसाठी मतदान दि. 21 ऑक्टोबर रोजी होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात 7 लक्ष 15 हजार मतदार आपले मत आजमावणार आहेत. आता प्रत्येकाला आपले नाव मतदार यादीत आहे का? कोणत्या मतदान केंद्रावर आपले नाव आहे?  आपली माहिती अचूक आहे का? असे अनेक प्रश्न पडतात. यासाठी निवडणूक आयोगाने वेगवेगळे पर्याय मतदारांसाठी उपलब्ध करुन दिले आहेत. जेणेकरुन ऐन मतदानादिवशी मतदारांची धावपळ होवू नये. यामध्ये प्रामुख्याने निवडणूक आयोगाची वेबसाईट www.nvsp.in आहे. तसेच मोबाईल ॲप voter helpline उपलब्ध आहे. तसेच टोल फ्री  1950 या क्रमांकावर काही अडचण असल्यास आपल्याला  माहिती मिळते. आपण या तीनही पर्यांयाबाबत सविस्तर माहिती पाहू.
1) वेबसाईट (www.nvsp.in): या वेबसाईटवर आपले नाव शोधता येते व मतदान केंद्रही शोधता येते. तसेच पुर्ण मतदार यादीही याठिकाणी उपलब्ध आहे. यासाठी वेबसाईटवर लॉग ईन केल्यावर आपणाला आपले नाव, वय किंवा जन्म तारीख, लिंग, राज्य, जिल्हा व मतदार संघाचे नाव टाकावे लागते. या प्रक्रियेद्वारे किंवा आपण आपल्या मतदान ओळखपत्र क्रमांकाद्वारेही (EPIC NO) तपशील शोधू शकतो.
2) मोबाईल ॲप : "Voter helpline" या मोबाईल ॲपवर आपण आपले मतदान केंद्र व इतर तपशील पाहू शकतो. तसेच या ॲपवर तक्रारी दाखल करणे, EVM मशीन व VVPAT बाबत माहिती, व्हिडीओ उपलब्ध आहेत. तसेच निवडणुक निकाल, निवडणुक तारखा व इतर तपशीलही आपणाला या ॲपवर सहज उपलब्ध आहेत. या ॲपवर आपला तपशील शोधण्यासाठी आपण नवीन पुरवण्यात आलेल्या मतदान ओळख पत्रावरील बार कोड स्कॅन केला तरी आपणाला मतदान केंद्राचे तपशील सहज मिळतात. तसेच आपले पुर्ण नाव व वय टाकूनही तपशील लगेच शोधता येतो. मतदान ओळखपत्र क्रमांक टाकला तरी आपले आवश्यक तपशील सहज उपलब्ध होतात.
3) टोल फ्री हेल्पलाईन नंबर - 1950 या हेल्पलाईन नंबरवर मोफत आपण आपल्या मतदान केंद्राचा तपशील मिळवू शकतो. फक्त 1950  डायल करुन ऑपरेटरला आपले नाव व वय सांगावे लागते. त्यानंतर ते काही सेकंदात आपल्याला निवडणुकीबाबत हवी ती माहिती पुरवतात. या हेल्पलाईन नंबरवर आपण आचारसंहिता भंग प्रकरण, तक्रारी तसेच उमेदवारांबाबतच्या आचार संहितेच्या अनुषंगाने तक्ररी दाखल करु शकतो.
4) मदत केंद्र - प्रत्येक मतदार संघात निवडणुक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात आपणाला मदत मिळते. या ठिकाणी लोकांच्या तसेच मतदारांच्या समस्यांना उत्तरे देण्यासाठी कक्ष सुरु असतो. त्या ठिकाणी आपल्याला मतदान व मतदान केंद्र याबाबत माहिती मिळू शकते.  
मतदारांना आवाहन आहे की त्यांनी यापैकी कोणत्याही एका पद्धतीने आपले तपशील मिळवून मतदान करावे. मतदान हा आपला हक्क आहे. आणि तो बजावणे हे कर्त्यव्य आहे. तेव्हा चला 21 ऑक्टोबर या दिवशी आपण आपला वेळ काढून मतदान करू.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-04


Related Photos