गडचिरोलीत राजकीय पक्षांच्या पदयात्रांनी ‘ट्रॅफिक जाम’!


- खोळंबून पडली अनेक वाहने, नागरीकांना त्रास
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली
: सध्या गडचिरोलीमध्ये राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे धानोरा आणि चंद्रपूर मार्गावर एकेरी वाहतूक सुरू आहे. तसेच शहरातील रस्त्यांची चाळणसुध्दा झाली आहे. असे असतानाही आज ४ ऑक्टोबर रोजी नामनिर्देशनपत्रे भरण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी चांगलेच शक्तीप्रदर्शन केले. मात्र उपविभागीय कार्यालयाकडे जाणारा धानोरा मार्ग एकेरी वाहतूकीचा असतानाही पदयात्रा मोठ्या प्रमाणात काढण्यात आल्यामुळे वाहतूकीचा चांगलाच खेळखंडोबा झाला होता. यामुळे अनेक वाहने खोळंबून पडली. यामुळे नागरीकांना त्रास सहन करावा लागला.
राजकीय वातावरण निर्मिती करण्यासाठी सर्वच उमेदवारांनी आज पदयात्रा काढल्या. गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील सर्वच पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते गडचिरोलीत दाखल झाले होते. यामुळे वाहनांची संख्या सुध्दा वाढली. परंतु ही वाहने सुध्दा एकेरी वाहतूक असलेल्या मार्गाच्या बाजूला लावण्यात आल्याचे दिसून आले. याच मार्गाने पदयात्रा निघाल्या. यामुळे वाहने खोळंबून पडली. चंद्रपूर, नागपूर, चामोर्शी आदी मार्गाने आलेल्या बसेसच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. पक्षांचे कार्यकर्ते परत आपआपल्या प्रचार कार्यालयात गेल्यानंतरच वाहतूक सुरळीत झाली.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-04


Related Photos