आमदार कृष्णा गजबे यांच्याकडे ७३ लाखांची संपत्ती, एकही गुन्हा दाखल नाही


- जंगम व स्थावर मालमत्तेचा समावेश
- १ लाख ६५ हजार ९४७ रूपयांची उधारी, अन्य कोणतेही कर्ज नाही
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली
: भाजपाचे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी आपल्या नामनिर्देशनपत्रात संपत्तीचे विवरण दिले असून त्यांच्याकडे जंगम व स्थावर अशी एकूण ७३ लाख २५ हजार १४०.१९ रूपयांची संपत्ती आहे. यामध्ये बॅंकेतील रोख, दाग - दागीणे, शेती, हातातील रोख , वाहने व विमा तसेच अन्य गुंतवणूकीचा समावेश आहेे. तर त्यांच्यावर केवळ डिझेल ची १ लाख ६५ हजार ९४७  रूपयांची उधारी असून अन्य कोणतेही कर्ज त्यांच्यावर नाही. आमदार कृष्णा गजबे यांच्यावर कोणतेही गुन्हे दाखल नाहीत. 
काल ३ ऑक्टोबर रोजी आमदार कृष्णा गजबे यांनी नामांन दाखल केले आहे. यामध्ये त्यांनी आपली संपूर्ण माहिती नमुद केली आहे. त्यांच्या हातात ८ लाख ६४ हजार ५६५ रूपयांची रोख रक्कम नमुद केली आहे. तर पत्नीकडे २६ हजारांची रक्कम आहे. अवलंबीत व्यक्तींकडे ६ हजार ५०० रूपये आहेत. आ. गजबे व त्यांच्या पत्नींच्या नावे विविध बॅंक खात्यांमध्ये रक्कम जमा आहे. ८  विमा पाॅलिसीमध्ये रक्कम गुंतवणूक केलेली आहे. त्यांच्याकडे ३  लाख ५० हजार रूपये किमतीचे ट्रॅक्टर , ९ लाख रूपये किमतीचे स्काॅर्पिओ वाहन आणि अवलंबित व्यक्तीच्या नावे १ लाख ८६ हजार १९० रूपये किमतीची राॅयल इनफिल्ड कंपनीची दुचाकी असल्याचे नमुद केले आहे.
आ. गजबे यांच्याकडे ३० ग्रॅम सोने असून त्याची किंमत १ लाख रूपये आहे. तर पत्नीकडे १०० ग्रॅम सोने असून त्याची किंमत ३  लाख ५० हजार रूपये आहे. अशी एकूण ४९ लाख २५ हजार १४०.१९  रूपये किंमतीची जंगम मालमत्ता आहे. तर पत्नीच्या नावे ७ लाख ६१ हजार ४६१ रूपये व अवलंबित व्यक्तीच्या नावे १ लाख ९३ हजार ९७३ रूपये किंमतीची मालमत्ता आहे.
आ. गजबे यांच्याकडे चालू बाजार किमतीनुसार स्वसंपादित २१ लाख ५० हजार व वारसाप्राप्त २  लाख ५० हजार अशी एकूण २४ लाखांची स्थावर मालमत्ता आहे.  २०१४ मध्ये गजबे यांच्याकडे ७  लाख ४ हजार ६५१ रूपयांची जंगम व ११ लाख ५० हजार रूपयांची स्थावर मालमत्ता होती. त्यांच्या पत्नीच्या नावे २ लाख एक हजारांची जंगम मालमत्ता होती. मागील पाच वर्षांत गजबे यांच्या संपतीत वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे.  गजबे यांनी बी.ए. अंतीम वषापर्यंत शिक्षण घेतले असूून  उन्हाळी २०१९ मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून परीक्षा दिली आहे.  

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-04


Related Photos