उमेदवारांनी गुन्हेगारी, फौजदारी प्रकरणांची माहिती वृत्तपत्र व टि.व्ही. वरुन प्रसिध्द करावी : निवडणूक आयोग


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : 
विधानसभा निवडणूकीसाठी अर्ज सादर करणाऱ्या  उमेदवारांनी त्यांच्यावरील गुन्हेगारी व फौजदारी प्रकरणाची माहिती जिल्हयातील सर्वाधिक खपाच्या वृत्तपत्रात व टि.व्ही चॅनेलवर प्रसिध्द करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या  २५ ऑक्टोबर २०१८  च्या निकालानुसार आयोगाने हे निर्देश दिले आहेत. भंडारा जिल्हयातील तुमसर, भंडारा आणि साकोली विधानसभा मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज भरणाऱ्या उमेदवाराने या निर्णयाचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना आयोगाने दिल्या आहेत. आयोगाच्या २८ सप्टेंबर २०१९ च्या पत्रानुसार उमेदवारावर गुन्हेगारी व फौजदारी प्रकरण असल्यास अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिनांकानंतर आणि मतदानाच्या दोन दिवस आधी किमान तीन वेळा वृत्तपत्र व टि.व्ही. चॅनलवरुन जाहिरात प्रसिध्द करणे आवश्यक आहे. सदर जाहिरात नमुना सी-1 मध्ये प्रसिध्द करुन जाहिरात प्रसिध्दीची माहिती भरुन नमुना ४ (उमेदवारांसाठी ) आणि नमुना ५ ( राजकीय पक्षांसाठी ) मध्ये भरुन जाहिरात प्रसिध्दीची माहिती भरुन निवडणूक निर्णय अधिकारी यांना सादर करणे बंधनकारक आहे. अशा प्रकारची माहिती सादर न केल्यास निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संबंधित उमेदवारावर कारवाई केली जाऊ शकते.
वृत्तपत्रात प्रसिध्द करावयाची जाहिरात ही तीन वेळा प्रसिध्द  करावी. मजकूराचा आकार फाँट १२ मध्ये असावा. टि.व्ही चॅनलवर देण्यात येणारी जाहिरात ही सकाळी ८ ते रात्री १० यावेळेत प्रसिध्द होणे गरजेचे आहे. तसेच तीन वेगवेगळया तारखांना तीन वेळा प्रसारित करणे बंधनकारक आहे. ज्या भागात उमेदवार निवडणूक  लढवित आहे, त्या भागातील प्रचलित भाषेत किंवा इंग्रजी भाषेत जाहिरातीचा मजकूर असावा. जाहिरातीच्या मजकूरात दाखल असलेल्या किंवा निकाल लागलेल्या प्रकरणांचा माहिती, सद्यस्थिती देणे बंधनकारक आहे. जाहिरात ही ७ सेकंदापेक्षा कमी नसावी. ज्या उमेदवारांवर गुन्हेगारी स्वरुपाचे प्रकरण दाखल नाहीत त्यांनी अशा प्रकारची जाहिरात देण्याची आवश्यकता नाही. मात्र ज्या उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत  किंवा गुन्हयांचा निकाल लागलेला आहे. अशा उमेदवारांना जाहिरात देणे बंधनकारक आहे.  Print


News - Bhandara | Posted : 2019-10-04


Related Photos