प्राणपूर रिठ (रीठी) गावाचे वनाधिकार बोदालदंड ग्रा.पं. ला द्या, अन्यथा निवडणूकीवर बहिष्कार टाकणार


- बोदालदंड, बेलारगोंदी आणि बिजेपार येथील ग्रामसभांचा निर्णय
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
वनाधिकाऱ्यांच्या चुकीने बोदालदंड अंतर्गत येणाऱ्या प्राणपूर रिठ कक्ष क्रमांक ५४६ आणि ५४७ चे वनाधिकार मुरकुटी ग्रामपंचायत अंतर्गत पड्यालजोग गावाला देण्यात आले आहे. यामुळे ग्रामपंचायत बोदालदंड, बेलारगोंदी आणि बिजेवार ग्रामसभांचा या वनक्षेत्रावर कोणताही अधिकार राहिलेला नाही. प्राणपूर रिठ हे बोदालदंड ग्रामपंचायत अंतर्गत येत असल्याने वनाधिकार बोदालदंड ग्रा.पं. अंतर्गत ग्रामसभांना देण्यात यावे, अन्यथा विधानसभा निवडणूकीवर बहिष्कार टाकू असा इशारा ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेतून दिला आहूे.
पत्रकार परिषदेला बोदालदंड ग्रामसभेचे अध्यक्ष किसन बोगा, बेलारगोंदी ग्रामसभेचे अध्यक्ष रामसाय केरामी, बिजेवार ग्रामसभेचे अध्यक्ष सुनहेर कुमरे, सदस्य पुनमचंद लाडे, शालिकराम हलामी, साधुराम नरोटी, कुशलता मडावी, तुलाराम कुमरे सुनिल होळी यांच्यासह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
प्राणपूर रिठ हे गाव ग्रामपंचायत बोदालदंड अंतर्गत येत असतानाही १९ जानेवारी २०११ रोजी ग्रामसभा मुरकुटी यांना वनहक्क दावा मंजूर करण्यात आला आहे. याबाबत वनाधिकारी, उपविभागीय वनाधिकारी, उपवनसंरक्षक, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, आमदार आदींना  पाठपुरावा करून न्याय मागण्यात आला. मात्र अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. यामुळे नागरीकांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेवून सदर प्रकरण निकाली काढण्याची मागणी केली आहे. वनविभगाच्या चुकीमुळे बोदालदंड ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या ग्रामसभांवर अन्याय होत आहे. शासनाने सामुहिक दाव्यासंदर्भाचे निर्णय, अटी, धोरण व त्रुटीमध्ये सुधार करण्याचे पत्र किंवा नोटीस ग्रामसभेला दिलेले नाही. आपल्या मर्जीनुसार ग्रामसभांना विचारात न घेता प्राणपूर रिठ मधील वनक्षेत्राचे वनाधिकार मुरकुटी ग्रा.पं. ला देण्यात आले आहे. हे नियमबाह्य असून बोदालदंड ग्रामपंचायतीला वनहक्काचा दावा न मिळाल्यास निवडणूकीवर बहिष्कार कायम राहिल, असेही नागरीकांनी म्हटले आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-03


Related Photos