महत्वाच्या बातम्या

 बेलोरा-टाकळी-जेना येथील भूमिहीन प्रकल्पग्रस्त व शेतकऱ्यांना तात्काळ न्याय द्या : शिवानी वडेट्टीवार


- इंटक व विजयक्रांती कामगार संघटनेचा एल्गार - अरविंदो रिॲलिटी अँड इन्फ्रस्ट्रक्चर प्रा. लि. कंपनी विरोधात बेमुदत काम बंद आंदोलन 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : सन २००० मध्ये पावर प्लांट उभारणीच्या नावावर शेतकऱ्यांची फसगत करून सेंट्रल कॉलरीज डागा कॉल फील्ड कंपनीने चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील बेलोरा जेना टाकळी या गावाची ३३० एकर जमीन संपादन केली. मात्र कुठलाही पावर प्लांट न उभारता येथील उत्खनन केलेला कोळसा खाजगी बाजारपेठेत विक्री करण्याचा गोरख धंदा सुरू केला. याची माहिती सामाजिक व राजकीय संघटनांना मिळताच शासनाकडे प्राप्त तक्रारीनुसार शासनाने सदर जमीन शासन जमा करून शेतकऱ्यांना व प्रकल्पग्रस्तांना कुठलीही पूर्वसचना न देता सन २०२२ मध्ये अरबिंदो रियालिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला शासनाच्या परवानगीने हस्तांतरित करण्यात आली. अत्यंत अल्प मोबदला व प्रकल्पग्रस्तांना नोकरी तसेच वाढीव मोबदला न मिळाल्याने आज येथील कामगारांनी राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) महाराष्ट्र तथा विजय क्रांती कामगार संघटना यांचे नेतृत्वात बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले असून प्रशासनाने तात्काळ दखल घेण्याची मागणी महाराष्ट्र युवक काँग्रेस प्रदेश सचिव तथा विजय क्रांती संघटनेच्या शिवानी वडेट्टीवार यांनी केली आहे.

सन २००० मध्ये सेंट्रल कॉलरीज (डागा कोल्डफील्ड) कंपनीने चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील बेलोरा ,जेना, टाकळी या गावांच्या शेतजमिनीचा खाजगी कोळसा खान करिता सर्वे केला असता तेथील जमिनीत ६० ते ७० फुटावर उत्तम प्रतीचा कोळसा साठा असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सदर कंपनीने या गाव परिसरातील 330 एकर जमीन संपादन करण्याचा निर्णय घेतला. मात्र अत्यल्प मोबदला कंपनीकडून मिळत असल्याने मोजके शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांनी कंपनीच्या या प्रस्तावाला स्पष्ट नकार दिला होता. अशातच कंपनीने बळजबरीचे धोरण अंगीकारून पोलीस प्रशासन व भूसंपादन प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन खोट्या गुन्ह्यांची नोंद करून शेतकऱ्यांवर बळजबरी चालवली. तसेच काही शेतकरी भोगवटदार वर्ग २ मध्ये मोडत असल्याने कंपनीने शेतकऱ्यांच्या अशिक्षितपणाचा व साधे भोळेपणाचा लाभ घेऊन भूसंपादन केले. पावर प्लांट उभारणी करिता सदर जमीन संपादित केल्यानंतरही कंपनीने कुठलाही पावर प्लांट न उभारता उत्खनन केलेला कोळसा थेट खाजगी बाजारपेठेत विक्री करीत असल्याची माहिती राजकीय संघटना व सामाजिक संघटना यांना मिळताच तक्रारीवरून शासनाने सदर जमीन शासन जमा केली. 

सदर जमिनीचे प्रकल्पग्रस्त तथा शेतकरी यांना वाढीव मोबदला तसेच नोकरी मिळाली नाही. तर सन २०२२ मध्ये संबंधित शेतकरी व प्रकल्पग्रस्त यांना कुठलीही माहिती न देता शासनाने सदर ३३० एकर जमीन अरबिंदो रियालिटी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला हस्तांतरित केली. यामुळे शेतकऱ्यांवर प्रचंड अन्याय होत असून प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना रोजगार न मिळाल्याने तसेच जमीन मालक शेतकऱ्यांना वाढीव मोबदला न मिळाल्याने आज ७ मार्च रोजी राष्ट्रीय मजूर काँग्रेस इंटक महाराष्ट्र व विजय क्रांती कामगार संघटना यांच्या माध्यमातून युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांचे नेतृत्वात वरोरा, भद्रावती तालुक्यातील तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी अरबिंदो रियालिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी विरोधात बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. आयोजित आंदोलना प्रसंगी प्रदेश काँग्रेस युवक सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार, राष्ट्रीय मजदूर काँग्रेस महाराष्ट्र ( इंटक ) चे जिल्हाध्यक्ष प्रवीण लांडगे, कामगार संघटना जिल्हाध्यक्ष प्रफुल जाधव, छोटू शेख माजी सभापती बांधकाम विभाग नगर परिषद वरोरा,बेलोरा सरपंच संगीता देहारकर, पोलीस पाटील उषा पंडिले, प्रकल्पग्रस्त सरला ठोंबरे, पूजा पिंपळकर, अल्का बुच्चे ,तारा घोटकर, प्रतिभा चिडे ,किरण चिडे, कांता मेश्राम, वंदना कमाडे, नागोजी शेंडे, वासुदेव शेंडे, शशिकला बुचे ,विलास परचाके, व बेलोरा, टाकळी, जेना येथील हजारो शेतकरी व प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. शासनाने सदर आंदोलनावर ताबडतोब तोडगा न काढल्यास होणाऱ्या सर्व हानिस प्रशासन व कंपनी जबाबदार राहील असे इंटक ने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

आंदोलन भूमिपुत्र व शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी... नवे खिसे भरण्यासाठी.... 

गेल्या दोन दशकापासून येथील शेतकरी व प्रकल्पग्रस्त तथा स्थानिक भूमिपुत्र यांना न्याय मिळवून देण्यासाठी कुठल्याही राजकीय किंवा सामाजिक संघटनेने पुढाकार घेतला नाही. ही अत्यंत खेदाची बाब असून यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा व भद्रावती तालुक्यातील तसेच बेलोरा टाकळी व जेना गाव परिसरातील भूमिपुत्रांना रोजगार मिळालेला नाही. राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) व विजय क्रांती कामगार संघटना यांनी आजपासून जे बेमुदत काम बंद आंदोलन पुकारलेले आहे. हे आंदोलन येथील शेतकरी प्रकल्पग्रस्त व भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी असून खिसे भरण्यासाठी नव्हे. आम्ही येथील शेतकरी प्रकल्पग्रस्त व भूमिपुत्र यांना नक्कीच न्याय मिळवून देऊ अशी भूमिका यावेळी युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस तथा विजय क्रांती कामगार संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष शिवानी वडेट्टीवार यांनी मांडली.





  Print






News - Chandrapur




Related Photos