बेकायदेशीरपणे ट्रॅक्टर जप्त करणाऱ्या महिंद्रा फायनान्स कंपनीला ग्राहक मंचाचा दणका


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / पवनी
: एम एस डब्ल्यू शिकलेल्या  सुशिक्षित बेरोजगाराने स्वयं रोजगाराच्या हेतूने महिंद्रा फायनान्स कंपनी कडून डिलर मार्फत घेतलेल्या कर्जाची परतफेड करून देखील बेकायदेशीरपणे ट्रॅक्टर जप्त करणाऱ्या  फायनान्स कंपनीला व ट्रॅक्टर डिलरला भंडारा ग्राहक न्यायालयाने दणका दिला असून कर्जापोटी जमा केलेली रक्कम व्याजासह अदा करण्याचे आदेश ग्राहक न्यायालयाने पारित केले आहेत. 
भंडारा जिल्ह्यातील  ढोरप येथील एम एस डब्ल्यू पर्यंत शिक्षण घेतलेला सुशिक्षित बेरोजगार युवक  रूपचंद अंबादास मेश्राम याने स्वयं रोजगाराच्या हेतूने शेतीची मशागत करण्यासाठी भंडारा येथील लक्ष्मी ॲग्रो इंडस्ट्रीज या महिंद्रा कंपनीच्या डिलर मार्फत ट्रॅक्टर खरेदी केला.त्यासाठी डिलर मार्फत महिंद्रा फायनान्स कंपनी कडून रूपये चार लाख अंशी हजार एवढे कर्ज घेतले होते. 
परंतु २० सप्टेंबर २०१३ ला  ट्रॅक्टर खरेदी करण्यात आल्यानंतर   वारंवार विनंती करून देखील आर टि ओ कार्यालयात नोंदणी करून देण्यात आली नाही. या दरम्यान मात्र रूपये चार लाख ४२ हजार एवढी रक्कम कर्जापोटी त्याच्याकडून वसूल करण्यात आली. 
एवढे असताना देखील लक्ष्मी ॲग्रो  इंडस्ट्रीज व महिंद्रा फायनान्स कंपनीच्या माणसांनी  १३ जुलै २०१४  ला रूपचंद मेश्राम यांच्या ताब्यातील ट्रॅक्टर बळजबरीने जप्त केला. त्यानंतर वारंवार ट्रॅक्टर ची मागणी करून देखील ट्रॅक्टर त्याला परत न मिळाल्याने त्याने ॲड. महेंद्र गोस्वामी यांच्या मार्फत भंडारा जिल्हा ग्राहक न्यायालयात प्रकरण दाखल केले.
या तक्रार प्रकरणाचे नोटिस बजावण्यात आल्यावर लक्ष्मी ॲग्रो इंडस्ट्रीज व महिंद्रा फायनान्स कंपनीने आपल्या वकीलामार्फत लेखी उत्तर दाखल करून आक्षेप घेतला. कर्जाची परतफेड केली नाही म्हणून नोंदणी करून देण्यात आली नाही  व ट्रॅक्टर रूपचंद मेश्राम यांच्याच ताब्यात आहे, असा पवित्रा घेतला. 
त्यामुळे तक्रारदार रूपचंद मेश्राम यांनी आर टी ओ कार्यालयात जाऊन चौकशी केली असता खरेदीच्या एक वर्ष आठ महिण्यानंतर  १ जून २०१५ ला ट्रॅक्टरची नोंदणी केल्याचे दिसून आले.तसेच तक्रारदाराने महिंद्रा फायनान्स कंपनीच्या वडधामना,नागपूर येथील यार्डमधील वाहनांची तपासणी केली असता त्याचा ट्रॅक्टर तिथे आढळून आला.
या प्रकरणी सखोल युक्तिवाद करून  राष्ट्रीय आयोगाने पारित केलेल्या न्याय निर्णयाचे दाखले देवून ७० टक्के कर्ज रक्कमेचा भरणा केल्यावर वाहन जप्त करता येत नाही व ट्रॅक्टरची नोंदणी आर टी ओ कार्यालयात वेळीच करून दिली नाही ,त्यामुळे तक्रारदाराने कर्जापोटी भरलेली रक्कम व्याजासह परत द्यावी, अशी मागणी ॲड. महेंद्र गोस्वामी यांनी केली.
या प्रकरणी ग्राहक तक्रार मंच भंडाराचे अध्यक्ष न्यायाधीश  भास्कर योगी व सदस्या वृषाली जागीरदार यांनी सखोल चौकशी करून व कागदपत्रासह दिलेल्या पुराव्याचे अवलोकन करून तक्रारदाराची तक्रार मंजूर केली व महिंद्रा फायनान्स कंपनी व लक्ष्मी ॲग्रो  इंडस्ट्रीज भंडारा यांनी चार लाख ४२ हजार रुपये ९ टक्के व्याजासह अदा करण्याचे आदेश दिले. तसेच मानसिक व आर्थिक नुकसान भरपाई रूपये विस हजार व प्रकरण खर्चाचे रूपये दहा हजार तक्रारदार रूपचंद मेश्राम यांना द्यावेत, असे देखील आदेश दिले आहेत. 
अशी प्रकरणे नेहमीच घडत असून कर्ज वितरण करणा-या फायनान्स कंपन्या दडपशाहीचा वापर करून कर्जदाराचे पोटाचे साधन असलेले वाहन जप्त करतात. त्यांना चपराक बसावी म्हणून त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा हा निर्णय आहे.  या प्रकरणी तक्रारदाराची बाजू ग्राहक न्यायालयाच्या समोर सर्व पुराव्यासह सक्षमपणे ॲड. महेंद्र गोस्वामी यांनी मांडली व तक्रारदार रूपचंद मेश्राम यांना न्याय मिळवून दिला.  Print


News - Bhandara | Posted : 2019-10-02


Related Photos