लोकशाही सुदृढ करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे : जिल्हाधिकारी शेखर सिंह


- मतदार जनजागृती रॅलीमधून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
लोकसभा निवडणुकीत गडचिरोलीमधील मतदान टक्केवारी ७२ टक्के होती. यामागचे प्रमुख योगदान गडचिरोली जिल्हयातील सामान्य नागरीक व मतदार यांना जाते. प्रशासन व पोलीस यांच्या सहकार्याने आपण लोकशाही सुदृढ करण्यासाठी आता विधानसभा निवडणुकांमध्येही मतदान करून मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी गांधी जयंती निमित्त आयोजित केलेल्या अहिंसा रॅली व मतदार जनजागृती कार्यक्रमात केले. 
यावेळी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, अति.पोलीस अधीक्षक डॉ.मोहित गर्ग, अति.पोलीस अधीक्षक सुदर्शन, अति.जिल्हा अधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी इंदुराणी जाखड, उप वनसंरक्षक कुमारस्वामी, निवासी उपजिल्हाधिरी अनंत वालसकर, उप जिल्हा निवडणुक अधिकारी कल्पना निळ-ठुबे उपस्थित होते. यावेळी उपस्थित नागरीकांना मतदानाचा हक्क बजावणीसाठी शपथ देण्यात आली.
 काही महिन्यांपुर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये जिल्हयातील मतदानाची टक्केवारी 71.98 होती. आता जिल्हयात 775240 मतदार असून यामध्ये 18 व 19 वर्षाचे नव मतदार 25085 आहेत. तसेच 20 ते 29 वर्ष वयोगटातील  171588 मतदार आहेत. या सर्व युवा मतदारांचा सहभाग महत्वाचा आहे. मध्यमवर्गीय 30 ते 59 वयोगटात जिल्हयात एकुण 460438 मतदार आहेत. 60 वर्ष ते 79 वर्ष या गटात 104167 मतदार आहेत. 80 वर्षांतेक्षा जास्त वयाचे जिल्हयात 13962 मतदार आहेत. यातील प्रत्येक वयोगट महत्वाचा असून त्यांनी मतदान करण्यासाठी व जिल्हयातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदानादिवशी हजर असणे आवश्यक आहे.
 महात्मा गांधींच्या 150 व्या जयंती निमित्त जिल्हयात विविध कार्यक्रमांचे आयोजन इंदिरा चौकात जिल्हा प्रशासनाच्या वतीने केले होते. पोलीस प्रशासनाकडुन अहिंसा रॅली, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मतदार जनजागृती रॅली व पथनाटय तर जिल्हा परिषदेकडून स्वच्छता रॅली काढण्यात आली. यावेळी विधानसभेचे औचित्य साधून जिल्हयातील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी तीनीही प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. जिल्हयातील नागरिक मोठया प्रमाणात मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी सर्वच स्तरावर कार्यक्रम घेतले जात आहेत. मतदारांना माहिती देण्यासाठी विविध बॅनर, पोस्टर्स ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. रॅली मधून जनजागृती वाहनही यावेळी सुरू करण्यात आले आहे. रॅलीमधील प्रमुख आकर्षण असलेल्या व्हॅन मधील टीव्हीवर निवडणुकीच्या अनुषंगाने माहितीपट, जाहिराती दाखविण्यात येणार आहेत. 
या वेळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मतदान व मतदान प्रक्रियावर आधारीत पथनाटय सादर केले. मतदान हा आपला हक्क आहे, मतदार हाच खरा लोकशाही सुदृढ करणारा घटक व पारदर्शक मतदान या मुद्यांवर आधारीत पथनाटय कार्यक्रम घेणेत आला. मतदार जनजागृती रॅलीमध्ये विविध शाळा व महाविद्यालयांचा सहभाग - गडचिरोली शहारातील बहुतेक सर्व शाळा व विद्यालयांनी मतदार जनजागृती रॅलीमध्ये सहभाग नोंदविला. 
शालेय मुला-मुलींचे मतदार जनजागृतीसाठीचे महत्व : बाल वयातच व तारूण्यात मुलांना लोकशाही, निवडणुक प्रक्रिया याबाबत माहिती मिळावी तसेच त्यांचा प्रौढांवर चांगल्याप्रकारे परिणाम साधता येतो म्हणून शालेय मुला-मुलींचा सहभाग जनजागृती कार्यक्रमांमध्ये होत आहे. तसेच प्रत्येक मुलांपर्यंत मतदानविषयक संदेश पोहचले तर त्याबाबत ते घरांमध्ये चर्चा करतात.त्यामुळे निश्चितच आवश्यक संदेश घरांपर्यंत जाण्यास मदत होते. अभ्यासक्रमात असलेले लोकशाही व निवडणुक प्रक्रिया याबाबतचे विषय त्यांना काही प्रमाणात प्रत्यक्षात अनुभवता येतात.

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-02


Related Photos