आपण जीवनात किती निर्णय घेतले यावर जीवनाची यशस्वीता अवलंबून आहे : अमर हबीब


- गोंडवाना विद्यापीठाचा ८ वा वर्धापन दिन
- समाजसेवक देवाजी तोफा, अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
  प्रतिनिधी / गडचिरोली :
जीवनाची यशस्वीता ही दुसर्या कुठल्याही निकषांवर अवलंबून नसून आपण जीवनात किती निर्णय घेतले यावर अवलंबून आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यीक अमर हबीब यांनी व्यक्त केले.
गोंडवाना विद्यापीठाचा ८ वा वर्धापन दिन तसेच महात्मा गांधी यांची १५० वी जयंती, स्व. लालबहादूर शास्त्री यांची जयंती गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने आरमोरी मार्गावरील संस्कृती सभागृहात आज २ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी उद्घाटक म्हणून अमर हबीब बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डाॅ. एन. व्ही. कल्याणकर होते. कार्यक्रमाला प्र - कुलगुरू डाॅ. चंद्रशेखर भुसारी, समाजसेवक देवाजी तोफा तसेच विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाचे सदस्य, अधिष्ठाता, संचालक, विद्यापीठाचे अधिकारी, विविध महाविद्यालयांचे अध्यक्ष, सचिव, प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमात सुप्रसिध्द समाजसेवक देवाजी तोफा यांना जीवन साधना गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. तसेच विद्यापीठांतर्गत विविध अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. 
पुढे बोलताना ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब म्हणाले, विद्यापीठाकडून समाजाच्या अपेक्षा आहेत आणि विद्यापीठाला भविष्यात खुप महत्व प्राप्त होणार आहे. समाजामध्ये दोन प्रकारच्या विचारसरणी दिसून येतात. एक म्हणजे मार्क्सवादी ज्यामध्ये वर्ग व वर्ग संघर्ष दिसून येतो. दुसरी म्हणजे जाती, धर्म, पंत आदींना माणणारी विचारधारा. विश्वामध्ये दोन वर्ग महत्वाचे आहेत. ज्यामध्ये एक जगाचा पोशिंदा शेतकरी आहे आणि दुसरा म्हणजे जगाचे निरंतर संवर्धन करणारी स्त्री आहे. आज हे दोन्ही वर्ग मोठ्या विवंचनेत दिसून येतात. कारण शेतकरी आत्महत्या करताना दिसून येत आहे आणि स्त्रीची भृणहत्या होताना दिसत आहे. हे दोन्ही वर्ग सृजनशिल आहेत. गांधीजींची विचारधारा ही नेहमी परिवर्तनिय राहिली आहे. गांधीजींना समजून घेतल्याशिवाय भारत हा देश समजून घेता येत नाही, असेही हबीब म्हणाले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना कुलगुरू डाॅ. कल्याणकर म्हणाले, विद्यापीठाच्या कामकाजाचा आढावा घेतला असता शैक्षणिक कार्याची सुरूवात खऱ्या अर्थाने आता विद्यापीठामध्ये सुरू झाली आहे. कारण त्यासाठी लागणारे प्राध्यापक नियुक्त करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर शासनाकडून नविन ७ पदव्युत्तर शैक्षणिक विभागांना पदांसह मंजूरी मिळाली आहे. विद्यापीठाच्या जागेचाही प्रश्न लवकरच मार्गी लागेल व विद्यापीठाला हक्काची जागा मिळेल. विद्यापीठाने पी.एच.डी. संशोधनासाठीची पेट परीक्षा पार पाडली आहे. त्यामुळे विद्यापीठामध्ये संशोधन कार्य होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सत्कारास उत्तर देताना देवाजी तोफा म्हणाले, हा सन्मान माझा नसून संपूर्ण माझ्या गावाचा आहे. मेंढालेखा ग्रामसभा ही गांधीजींच्या ग्राम स्वराज्य संकल्पनेतून स्थापन केली आहे. माझे आदर्श महान व्यक्त आहेत. ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, राष्टसंत तुकडोजी महाराज यांचा समावेश आहे. आदिवासी समाज किंवा गडचिरोली जिल्हा मागासलेला नसून तो प्रगत आहे. कारण कुठल्याही जिल्ह्यापेक्षा पुरूषांच्या तुलनेत स्त्रीयांची संख्या येथे जास्त् आहे. आदिवासी हा निसर्गावर प्रेम करणारा असून तो निसर्गाच्या सानिध्यामध्ये जीवन जगणारा एक सुसंस्कृत समुदाय आहे, असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या शेवटी व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन डाॅ. नरेंद्र आरेकर यांनी केले.  आभार कुलसचिव डाॅ. ईश्वर मोहुर्ले यांनी मानले.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-02


Related Photos