महत्वाच्या बातम्या

 मोकाट जनावरांना लावणार रिफ्लेक्टिव्ह बेल्ट : उपक्रमाची विभागीय आयुक्तांनी जाणून घेतली माहिती


- रस्ता सुरक्षा वाढविण्यासाठी अभिनव उपक्रम

- प्राण्यांना जियोटॅगींगयुक्त बेल्ट लावणारा पहिला उपक्रम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : मानवी चुकांमुळे रस्ते अपघातामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी होते. रस्त्यावर जनावरांना धडक लागून अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे. पर्यायाने अपघातात वाहन चालकाच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. मोकाट जनावरांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने ॲप विकसित करुन ॲपच्या आधारे जिओ टॅगींग करुन महामार्ग परिसरातील गावात जनावरांना रिफ्लेक्टिव्ह बेल्ट लावण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाची माहिती आज विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मो. युसुफ मो. समिर यांच्याकडून जाणून घेतली.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्यकार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलिस अधिक्षक नुरुल हसन आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात या उपक्रमामुळे वाहनचालक आणि स्वतः प्राणी दोघांचेही रक्षण होईल. प्राण्यांना रिफ्लेक्टिव्ह बेल्टने सुसज्ज करून, विशेषत: कमी प्रकाशाच्या परिस्थितीत किंवा रात्रीच्या वेळी टक्कर होण्याच्या घटना लक्षणीयरित्या कमी होईल. असाच उपक्रम इतर जिल्ह्यानी सुध्दा राबविल्यास जनावरांमुळे होणारे अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असे विजयलक्ष्मी बिदरी यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनात जिल्हा नियोजन समितीच्या नावीण्यपूर्ण योजनेतून परिवहन विभागामार्फत ५ हजार ५०० रिफ्लेक्टिव्ह बेल्ट लावण्याचा उपक्रम राबविण्यात येत असून स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून महामार्गावरील गावपरिसरातील जनावरांना रिफ्लेक्टिव्ह बेल्ट लावण्यात येत आहे.

केवळ दृश्यमानता वाढवण्यासाठी नाही तर त्याच्या अंमलबजावणीमध्ये पारदर्शकता आणि परिणामकारकता देखील आहे. प्रत्येक प्राण्याला जिओ-टॅग केले जाईल आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी आणि उपक्रमाच्या प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी ॲपव्दारे सर्वसमावेशक फोटो घेतले जात आहे. 

गुरांचे रस्त्यावर येणे थांबविणे शक्य नसले तरी रिफ्लेक्टिव्ह बेल्ट लावून त्यांच्यामुळे होणारे अपघात टाळता येणार आहेत. नागरिकांनी शहरातील भागात मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्रे तसेच गुरे दिसल्यास पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos