आजपासून विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या दरात पंधरा रुपायांनी वाढ : महिन्याभरचं बजेट पुन्हा एकदा कोलमडणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
आजपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. एकीकडे महागाईनं डोकं वर काढलं असताना दुसरीकडे आजपासून सिलेंडरच्या किंमतीतही वाढ झाली. त्यामुळे महिलांचं महिन्याभरचं बजेट पुन्हा एकदा कोलमडणार आहे.
सलग दुसऱ्या महिन्यात ही दरवाढ करण्यात आली आहे. विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या दरात 15 रूपयांची वाढ करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात 14.2 किलोच्या विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या दरात 15 रूपये 50 पैशांची वाढ करण्यात आली होती.
आज नवी दिल्लीत 14.2 किलोच्या विनाअनुदानित सिलेंडरसाठी 605 रूपये मोजावे लागणार आहेत. कोलकत्त्यात सिलेंडरसाठी 630 द्यावे लागतील. मुंबई आणि चेन्नईमध्ये सिलेंडरसाठी अनुक्रमे 574.50 रूपये आणि 620 रूपये मोजावे लागणार आहेत.
19 किलोच्या विनाअनुदानित सिलेंडरची किंमत दिल्लीत 1 हजार 85 रूपये, कोलकत्ता आणि मुंबईत अनुक्रमे 1 हजार 139 रूपये आणि 1 हजार 32 रूपये इतकी झाली आहे. तर चेन्नईमध्ये 1199 रूपये 19 किलोच्या सिलेंडरची किंमत आहे.
ओनएनजीसी आणि इंडियन ऑईल लिमिटेडद्वारे पुरवल्या जाणाऱ्या नैसर्गिक वायूची किंमत कमी करून 3.32 डॉलर्स प्रति मिलियन ब्रिटीश थर्मल युनिट केल्याची माहिची पेट्रोलिअम प्लॅनिंग अ‌ॅड अ‌ॅनालिसिस सेलकडून देण्यात आली. 1 ऑक्टोबरपासून पुढच्या सहा महिन्यांसाठी हे नवीन दर लागू असतील.  Print


News - World | Posted : 2019-10-01


Related Photos