महत्वाच्या बातम्या

 राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये २ हजार २८ प्रकरणी यशस्वीपणे निकाली


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्ष एस.एस. भीष्म यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये २०२८ प्रकरणे यशस्वीपणे निकाली काढण्यात आली.

सदर लोक अदालतीमध्ये प्रलंबित न्यायालयीन १० हजार ३१० व दाखल पूर्व १९ हजार ५४५ प्रकरणे ठेवण्यात आली होती. प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांपैकी १०१६ प्रकरणे तर दाखल पूर्व प्रकरणांपैकी १०१२ प्रकरणे निकाली काढण्यात आली. प्रलंबित प्रकरणांमध्ये मोटर वाहन अपघात नुकसान भरपाईची एकूण १७ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून नुकसान भरपाई २ कोटी ९ लक्ष ७१ हजार ३८० रुपये वसूल करण्यात आले. यापैकी एका प्रकरणात सर्वाधिक ८४ लक्ष रकमेचा नुकसान भरपाईसाठीचा धनादेश गोडीजीट विमा कंपनी मार्फत पक्षकारात देण्यात आला.

भूसंपादन प्रकरणांपैकी एकूण नऊ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून मोबदल्याची रक्कम ५८ लक्ष २६ हजार ९१० अदा करण्यात आली आहे. कौटुंबिक वाद म्हणजेच घटस्फोटाच्या प्रकरणांपैकी पाच प्रकरणांमध्ये पक्षकांनी एकत्र राहण्याचा समजुतीने निर्णय घेतला. धनादेश प्रकरणापैकी १०७ प्रकरणे निकाली काढण्यात आली तर औद्योगिक व कामगार न्यायालयातील सात प्रकरणे राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये निकाली काढण्यात आली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व न्यायालयात लोक अदालत यशस्वी करण्यासाठी सर्व न्यायाधीश, सर्व वकील, न्यायालयीन कर्मचारी व पोलीस कर्मचारी आदींनी सहकार्य केल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी यांनी दिली.





  Print






News - Chandrapur




Related Photos