शरद पवार यांना होणार त्रास असह्य झाल्याने दिला राजीनामा : अजित पवार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्याशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा कोणताही संबंध नसताना त्यांचे नाव नाहक गोवण्यात आले. मी बँकेच्या संचालक मंडळावर असल्यामुळंच पवारसाहेबांचं नाव आलं. त्यांना माझ्यामुळे त्रास सहन करावा लागत असल्याचं पाहून अस्वस्थ झालो. त्याच उद्विग्नतेतून राजीनामा दिला,' असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज स्पष्ट केलं.
अजित पवार यांनी शुक्रवारी तडकाफडकी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते 'नॉट रिचेबल' झाले होते. त्यामुळं त्यांच्या राजीनाम्याचे गूढ वाढले होते. अखेर शरद पवारांशी झालेल्या चर्चेनंतर अजित पवार यांनी आज स्वत:च सगळ्या गोष्टींचा खुलासा केला. 'कोणालाही कल्पना न देता राजीनामा दिल्याबद्दल त्यांनी सर्वप्रथम पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांची माफी मागितली. 'पवार साहेबांवर होणाऱ्या आरोपांमुळं मी व्यथित झालो होतो. सतत आमची नावं टीव्हीवर झळकत होती. साहेबांवर गुन्हा दाखल झाला. ज्यांच्यामुळं आपण इथवर आलो, त्यांना आपल्यामुळं त्रास होतोय हे मला सहन होत नव्हतं. काय करावं मला कळत नव्हतं. त्याच उद्विग्नतेतून मी राजीनामा दिला,' असं अजित पवार म्हणाले.
अजित पवारांच्या राजीनाम्याचा संबंध कालपासून पवार कुटुंबातील कलहाशी जोडला जात होता. त्यावरही त्यांनी खुलासा केला. 'आमच्या कुटुंबात कसलाही कलह नाही. आमचं कुटुंब मोठं असलं तरी घरातल्या मोठ्या व्यक्तीच्या मार्गदर्शनाखालीच सर्व गोष्टी होतात. पवार साहेब सांगतील तेच आम्ही ऐकतो हे त्रिवार सत्य आहे. ही पत्रकार परिषदही मी त्यांच्या सांगण्यावरूनच घेतोय, असं ते म्हणाले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झालेल्या या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड आदी नेते उपस्थित होते.  Print


News - Rajy | Posted : 2019-09-28


Related Photos