उद्या भाजपाची पहिली यादी जाहिर होण्याची शक्यता


- दिग्गजांचा व विद्यमान मंत्र्यांचा राहणार समावेश
- अनेकांना डच्चू मिळण्याची शक्यता
- गडचिरोली जिल्ह्यातील उमेदवारीचे चित्र अद्याप अस्पष्ट
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली
: विधानसभा निवडणूकीचे नामनिर्देशनपत्रे भरण्यास प्रारंभ झाला असतानाही सर्वच पक्षांनी अनेक मतदारसंघातील उमेदवारी जाहिर केलेली नाही. यामुळे कार्यकर्ते व मतदार संभ्रमात आहेत. काल काॅंग्रेसने आपली दुसरी यादी जाहिर केली. यामध्येही अनेक मतदारसंघाचा समावेश नाही. आता उद्या भारतीय जनता पार्टीची पहिली उमेदवारी यादी जाहिर होणार असल्याची माहिती अधिकृत सुत्रांकडून प्राप्त झाली असून या यादीत विद्यमान मंत्री आणि दिग्गजांच्या उमेदवारीचा समावेश राहण्याची शक्यता आहे. तर गटबाजी आणि पक्षांतराच्या धोक्यामुळे काही मतदारसंघाची उमेदवारी ऐनवेळी घोषित केली जाउ शकते.
विधानसभा रणधुमाळीला सुरूवात झाली. काल २७ सप्टेंबरपासून नामनिर्देशपत्रे भरण्यास प्रारंभ झाला आहे. मात्र प्रमुख पक्षांच्या एकाही उमेदवाराने अद्याप  नामांकन केलेले नाही. भाजपा - शिवसेना मधील जागावाटपाचे गणित अजूनही ठरलेले नाही. यामुळे अद्याप भाजपाने आणि शिवसेनेने आपली यादी जाहिर केलेली नाही. काॅंग्रेस आणि राकाॅंने आपल्या काही उमेदवारांची घोषणा केली. वंचित बहुजन आघाडीनेही पहिली यादी जाहिर केली. आता भाजपाच्या यादीकडे लक्ष लागले असून पहिल्या यादीत कोणाचा समावेश राहणार आहे, हे यादी जाहिर झाल्यानंतरच कळणार आहे.
भाजपाच्या दररोज बैठका होत आहेत. काही दिवसांपूर्वी विद्यमान भाजपच्या २५ आमदारांचा पत्ता कट होणार अशी चर्चा होती. यामुळे अनेक विद्यमान आमदारांच्या मनात धाकधूक आहे. गडचिरोली जिल्ह्यातील राजकीय वातावरणसुध्दा भाजपच्या उमेदवारी जाहिर करण्याला पोषक नसल्याचेच दिसून येत आहे. यामुळे येत्या १ ऑक्टोबर पर्यंत किंवा त्यापुढे जिल्ह्यातील तिनही मतदारसंघातील उमेदवारी जाहिर होण्याची शक्यता आहे. सध्या भाजपामध्ये आयारामांची संख्या वाढली आहे. अनेकजण भाजपाकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत आहेत. तर विद्यमानांकडूनसुध्दा उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू आहेत. यामुळे आताच उमेदवारी जाहिर केल्यास बंडखोरीचा आणि पक्षांतराचा फटका बसण्याची शक्यता लक्षात घेता भाजपा सावधतेनेच उमेदवारांची घोषणा करणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. 
दुसरीकडे काॅंग्रेसनेही जिल्ह्यातील तिनही मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केलेली नाही. काॅंग्रेसकडे जिल्ह्यातील आरमोरी आणि गडचिरोली हे मतदारसंघ आहेत. तर अहेरी मतदारसंघ राकाॅंकडे आहे. आरमोरी आणि गडचिरोली विधानसभा क्षेत्रात अनेकांनी काॅंग्रेसच्या उमेदवारीवर दावेदारी केली आहे. आता काॅंग्रेस कोणाच्या पारड्यात उमेदवारी टाकते याकडेही जनतेचे तसेच कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-28


Related Photos