मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला अद्याप पोषक वातावरण नाही, १५ ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रातून बाहेर पडणार


वृत्तसंस्था / पुणे : हवामान विभागाच्या निकषानुसार ३० सप्टेंबरला मान्सूनचा हंगाम संपत असला, तरी यंदा अजून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला पोषक वातावरण तयार झालेले नाही. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मान्सून राजस्थानमधून, तर पंधरा तारखेपर्यंत महाराष्ट्रातून बाहेर पडणार आहे. या वर्षी नवरात्रातही पाऊस सक्रिय राहील, येत्या दोन दिवसांत शहरात पावसाच्या हलक्या सरी पडतील, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.
मान्सूनचा परतीचा प्रवास सरासरी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होतो आणि शेवटच्या आठवड्यात तो महाराष्ट्रातून परत फिरतो. या वर्षी मान्सून राज्यात उशिरा दाखल झाला आणि आता परतीच्या प्रवासालाही उशीर झाला आहे. राज्यातील बहुतांश भागात या वेळी समाधानकारक आणि काही ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस नोंदविण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने सरासरी गाठली नव्हती. मात्र, आठवडाभरात बरसलेल्या सरींनी अजून काही जिल्ह्यांची तूट भरून काढली.  पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुण्यात आकाश सामान्यत: ढगाळ राहणार असून, संध्याकाळनंतर ढगांच्या गडगडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल.'
  Print


News - Rajy | Posted : 2019-09-28


Related Photos