विद्यमान आमदार ज्योती कलानी यांचा राष्ट्रवादीला रामराम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / उल्हासनगर :
  विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. एकामागून एक नेते पक्षाला रामराम ठोकत असतानाच उल्हासनगरच्या विद्यमान आमदार ज्योती कलानी यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे. आमदार ज्योती कलानी यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा आणि विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे त्यांनी राजीनामा पाठवला असून त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसमोर कोणाला उमेदवारी द्यावी, हा पेच पडण्याची चिन्हे आहेत.
ज्योती कलानी या राष्ट्रवादीचे माजी आमदार पप्पू कलानी यांच्या पत्नी आहेत. कलानी कुटुंब हे कोणे एके काळी शरद पवारांचे निकटवर्तीय होते. चार वेळा आमदार राहिलेल्या पप्पू कलानी यांना २०१३ मध्ये एका हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. त्यानंतर कलानी कुटुंबाचे पवारांशी असलेले संबंध कमी होत गेले. २०१७ मधील उल्हासनगर महापालिका निवडणुकांच्या वेळी कलानी कुटुंब भाजपच्या संपर्कात आले. ज्योती कलानी यांच्या सूनबाई पंचम कलानी या भाजपच्या तिकीटावर उल्हासनगरच्या महापौरपदी निवडून आल्या आहेत. त्यापाठोपाठ कलानी कुटुंबालाही भाजपकडून उमेदवारी मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ज्योती कलानीही भाजपचा झेंडा हाती धरणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुसरीकडे, भाजपचे माजी आमदार कुमार आयलानी यांनी उल्हासनगरमधून उमेदवारी मिळण्यासाठी भाजपच्या वरिष्ठांना गळ घातल्याचे बोलले जात आहे. भाजपला महापालिकेत सत्तेपर्यंत नेण्यात मोलाचा वाटा असलेल्या ओमी कलानी यांनीही भाजपकडून आमदारकीच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्र्यांकडे शब्द टाकला आहे. शहरातील विद्यमान आमदार असल्याने आपल्याला उमेदवारी मिळावी, अशी मागणी ओमी कलानी यांनी केली आहे. उल्हासनगर मतदारसंघासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवाराबाबत राजकीय वर्तुळात कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीकडून उल्हासनगर शहराध्यक्ष भारत गंगोत्री यांची विधानसभेसाठी दावेदारी निश्चित मानली जात आहे. गंगोत्री हे राष्ट्रवादीच्या तिकीटावर दोन वेळा नगरसेवकपदी निवडून आले आहेत. त्यांच्या मातोश्री पुष्पा गंगोत्रीही राष्ट्रवादीच्या नगरसेविका होत्या.
  Print


News - Rajy | Posted : 2019-09-27


Related Photos