जिद्द व चिकाटीनेच यशाचे शिखर गाठता येते : आ. प्रा. सोले


- रोजगार मेळावा व मार्गदर्शन शिबीर
- हजारो युवक-युवतींची हजेरी 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : 
नोकरी छाटी असो वा मोठी असो, आयुष्यातील पहिली नोकरी फार महत्वाची असते. त्यात केलेली मेहनत ही व्यक्तीला खूप काही शिकवण देते. कोणत्याही क्षेत्रात असताना कामाप्रती प्रामाणिकता ही त्या व्यक्तीची ओळख निर्माण करीत असून जिद्द व चिकाटीनेच यशाचे शिखर गाठता येत असल्याचे प्रतिपादन आ. प्रा. अनिल सोले यांनी केले. 
ते येथील जिनियस लॉन येथे मंगळवार ११ सप्टेंबर रोजी फॉर्चून फाऊंडेशन तर्फे आयोजित यूथ एम्पॉवरमेंट समिट या भव्य रोजगार मेळावा व मार्गदर्शन शिबीरात अध्यक्षीयस्थानावरून बोलत होते. यावेळी प्रामुख्याने भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, आ. डॉ. परिणय फूके, आ. विजय रहांगडाले, आ. संजय पुराम, कार्यक्रमाचे संयोजक भाजपा प्रदेश कार्यकारीणी सदस्य विनोद अग्रवाल, माजी जिप अध्यक्ष नेतराम कटरे, जिप सभापती शैलजा सोनवाने, विश्वजीत डोंगरे, जिप सदस्य कमलेश्वरी लिल्हारे, छाया दसरे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार बिसेन, भाजपा शहरअध्यक्ष सुनील केलनका, जिल्हा महामंत्री भाऊराव उके, पंस सदस्य रामराज खरे, नप गटनेता घनश्याम पानतवने, नगरसेवक बंटी पंचबुद्धे, निरज कटकवार, गजेंद्र फूंडे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना प्रा. सोले म्हणाले की यश व अपयशामध्ये फार कमी अंतर असते. मात्र, कुठल्याही कार्यात सातत्य राखल्यास अपयशाला यशात बदलता येते. आजचा हा मेळावा युवकांना प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरणार असून दरवर्षी जिल्ह्यात या मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी कार्यक्रमाचे संयोजक विनोद अग्रवाल यांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितले की, जिल्ह्यातील हजारो तरुणांच्या हाताला काम मिळावे, ते मोठे व्हावे, त्यांना योग्य दिशा सापडावी, त्यांचा उद्याचा भविष्य सुकर व्हावा हा या कार्यक्रमाचा उद्देश असून जिल्ह्यातील युवक-युवती या मेळाव्याच्या माध्यमातून घडणार असल्याचे ते म्हणाले. या प्रसंगी आ. फुले, आ. रहांगडाले, आ. पुराम यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सदर मेळावा हा दोन सत्रात घेण्यात आला ज्यामध्ये पहिल्या सत्रात नवभारत वृत्तपत्राचे संपादक संजय तिवारी यांनी युवकांना यशस्वी होण्याचे मंत्र देऊन प्रेरणादायी मार्गदर्शन केले तर दुसऱ्या सत्रात आदिवासी विभागाचे अप्पर आयुक्त ऋषीकेश मोडक यांनी उपस्थित युवक-युवतींना लक्ष्य प्राप्ती साठी  शून्य पासून ते शिखर गाठण्याची अनेक प्रेरक उदाहरणातून सांगितले व आपल्या ओजस्वी मार्गदर्शन करतांना आत्मविश्वास व यशासाठी दररोज एक तास व्यायामासाठी देण्याचेही सांगितले. विशेष म्हणजे मेळाव्यात बीपीओ, केपीओ, ऑटोमोबईल आदी संबधीत ३४ कंपन्यांनी या मेळाव्यात हजेरी लावली होती. ज्यामध्ये हजारोच्या संख्येने आलेल्या जिल्हा व परिसरातील युवक-युवतींना या कपंनीच्या अधिकाऱ्यांनी चाचणी घेवून योग्यतेनुसार मुलाखती घेतल्या व निवड झालेल्यांना नियूक्ती पत्र दिले. संचालन अशोक हरिनखेडे यांनी केले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

मुलाखतीचे अनुभव आले....  

मेळाव्यात जिल्ह्यातील युवक-युवतींनी एकच गर्दी करत मोठ्या उत्सूकतेने कंपन्यांची मुलाखत दिली. तेव्हा मुलाखतीनंतर पहिल्यांदाच एक उत्साहपूर्ण अनुभव आल्याच्या प्रतिक्रीया यावेळी त्यांनी व्यक्त करून असे मेळावे आमच्यासाठी निश्चितच मार्गदर्शक ठरणार असून नोकरीची संधी मिळत असल्याचा विश्वास व्यक्त केला. 

चौदाशेच्या वर युवक - युवतींना जॉब ऑफर.....

मेळाव्याला सकाळी सुरुवात होताच जिल्ह्यातील हजारोच्या सख्येनी युवक -युवतींनी मेळाव्यात गर्दी करीत योग्यतेनुसार संबंधित कंपन्यांच्या मुलाखतीला सामोरे गेले. ज्यामध्ये सायंकाळी ५ वाजतापर्यंत सुमारे एक हजार चारशे युवक-युवतींना जॉब ऑफर पत्र देण्यात आल्याची व यात आणखी वाढ होणार असल्याची माहिती मेळाव्याचे संयोजक विनोद अग्रवाल यांनी दिली.



  Print






News - Gondia | Posted : 2018-09-12






Related Photos