महत्वाच्या बातम्या

 गुजरात किनाऱ्यावर २ हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त


- इराणी जहाजातून ३ हजार ३०० किलो वजनाचे अमली पदार्थ जप्त 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / पोरबंदर/नवी दिल्ली : गुजरातलगत अरबी समुद्रात भारतीय सुरक्षा यंत्रणा व अमली पदार्थ विरोधी यंत्रणांनी एका इराणी जहाजातून ३ हजार ३०० किलो वजनाचे अमली पदार्थ जप्त केले असून याप्रकरणी पाच विदेशी नागिरकांना अटक केली. समुद्रात केलेल्या कारवाईत प्रथमच इतका मोठा साठा जप्त करण्यात आला. 

जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत अंदाजे २ हजार कोटी रुपये आहे. गेल्या सात दिवसांत अमली पदार्थांच्या तस्करीचे मोठे जाळे उद्ध्वस्त करण्यात आले आहे़. पुणे आणि दिल्लीत झालेल्या कारवायांसह सुमारे ७ हजार ५०० कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले की, नौदल, अमली पदार्थ नियंत्रण ब्युरो (एनसीबी), गुजरात पोलिस यांनी केलेल्या संयुक्त कारवाईला ऐतिहासिक स्वरूपाचे यश मिळाले आहे. देशाला अमली पदार्थांपासून मुक्त करणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्दिष्ट असून त्यानुसार ही पावले उचलण्यात आली आहेत.

अटक केलेले इराण किंवा पाकिस्तानचे नागरिक? : 

- एनसीबीने सांगितले की, आंतरराष्ट्रीय टोळीकडून समुद्रमार्गे तस्करी करण्यात आलेला आजवरचा सर्वांत मोठा अमली पदार्थांचा साठा पकडण्यात आला.

- याप्रकरणी अटक केलेले पाच जण इराण किंवा पाकिस्तानचे नागरिक असावेत असा संशय आहे.

- ते कोणत्या देशाचे नागरिक आहेत हे स्पष्ट करणारी कोणतीही कागदपत्रे या आरोपींकडे सापडली नाहीत.

इराणी जहाजावर होते तस्कर : 

आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषेवर (आयबीएमएल) अरबी समुद्रात वेरावल बंदरापासून २ किलोमीटर अंतरावर ही कारवाई करण्यात आली. पाचही तस्कर इराणी जहाजावर होते. जप्त केलेल्या ३ हजार ३०० किलो अमली पदार्थांमध्ये ३०८९ किलो चरस, १५८ किलो मेथॅम्फेटामाइन, २५ किलो मॉर्फिनचा समावेश आहे.





  Print






News - Rajy




Related Photos