पुणे ढगफुटी : मृत्युसंख्या पोहचली १९ वर


वृत्तसंस्था /  पुणे : शहर आणि परिसरात बुधवारी रात्री अवघ्या दोन-अडीच तासांत झालेल्या पावसामुळे     १९ नागरिकांना जीव गमवावा लागला. नऊ नागरिक अजूनही बेपत्ता असून, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ओढे - नाल्यांलगतच्या अतिक्रमणांमुळे पाण्याने रौद्ररूप धारण केले. त्यात अनेक वाहने वाहून गेली. महापालिका आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाने (एनडीआरएफ) केलेल्या बचावकार्यात गुरुवारी तीन हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.
 दोन दिवसांपासून शहरात पावसाने  हजेरी लावली होती. बुधवारी सलग तिसऱ्या रात्री नऊ - साडेनऊच्या सुमारास पाऊस सुरू झाला. एकंदरीत ढगफुटी झाल्याचे दृश्य होते. शहराच्या सर्वच भागांत पावसाचा जोर असला, तरी कात्रज, आंबेगाव, बिबवेवाडी, सहकारनगर, सिंहगड रस्ता या ठिकाणी त्याचा जोर अधिक होता. त्यामुळे या भागातील ओढ्या-नाल्यांमधील पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला. हे सर्व लहान-लहान नाले आंबिल ओढ्याला मिळत असल्याने अनेक वर्षांनी या ओढ्याचे पाणी पात्राबाहेर पडले. या वेळी पाण्याला प्रचंड वेग असल्याने आजूबाजूच्या वस्त्या आणि सोसायट्यांच्या भिंती फोडून पाणी घरांत आणि वस्त्यांमध्ये शिरले. अरण्येश्वर येथील टांगेवाले कॉलनीत भिंत पडल्याने पाच जणांचा मृत्यू झाला. तर, अनेक ठिकाणी पाण्याच्या प्रवाहात गाड्या वाहून गेल्यानेही काही नागरिकांना जीव गमवावा लागला. त्यांचे मृतदेह गुरुवारी सापडले. अजूनही नऊ ते दहा नागरिक बेपत्ता असून, त्यांचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. शहरासह जिल्ह्यातही बुधवारी रात्री पावसाचा जोर अधिक होता. खेड-शिवापूर येथे नाल्यात वाहून आलेले चार मृतदेह सापडले. तर, सासवडमधील सिद्धेश्वर वस्तीमध्ये दोन नागरिकांचे बळी गेले. 
  Print


News - Rajy | Posted : 2019-09-27


Related Photos