२ ऑक्टोबर ला गोंडवाना विद्यापीठाचा ८ वा वर्धापन दिन, समाजसेवक देवाजी तोफा यांना जीवन साधना गौरव पुरस्काराने सन्मानित करणार


- कुलगुरू डाॅ. नामदेव कल्याणकर यांची पत्रकार परिषदेतून माहिती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
येत्या २ ऑक्टोबर  रोजी गांधी जयंतीदिनी गोंडवाना विद्यापीठाचा आठवा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात विद्यापीठाच्या वतीने प्रसिध्द समाजसेवक देवाजी नवलु तोफा यांचा जीवन साधना गौरव पुरस्कार देवून तसेच विविध अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. नामदेव कल्याणकर यांनी आज २६ सप्टेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेतून दिली आहे. पत्रकार परिषदेला प्रभारी कुलगुरू डाॅ. चंद्रशेखर भुसारी, कुलसचिव डाॅ. ईश्वर मोहुर्ले उपस्थित होते.
२७ सप्टेंबर २०११ च्या शासनाच्या अधिसुचनेनुसार गोंडवाना विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. २  ऑक्टोबर २०११ रोजी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती पर्वावर विद्यापीठाची सुरूवात करण्यात आली. याला आता ८ वर्ष पूर्ण होत आहेत. यामुळे आरमोरी मार्गावरील संस्कृती सांस्कृतिक सभागृहात सकाळी ११ वाजता वर्धापन दिन तसेच सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार तथा साहित्यीक अमर हबीब यांच्याहस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी कुलगुरू डाॅ. नामदेव कल्याणकर तसेच प्र. कुलगुरू डाॅ. चंद्रशेखर भुसारी उपस्थित राहतील. 
कार्यक्रमात प्रसिध्द समाजसेवक देवाजी मोफा यांना जीवन साधना गौरव, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तुकूम चंद्रपूरचे प्रा.डाॅ. जनार्धन माधव काकडे यांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, उच्चश्रेणी लिपीक निलेश काळे यांना उत्कृष्ट विद्यापीठ कर्मचारी वर्ग ३, उद्यानरेजा अमोल रंगारी यांना उत्कृष्ट विद्यापीठ कर्मचारी पुरस्कार वर्ग ४, गोविंदराव वारजूरकर कला, वाणिज्य महाविद्यालय नागभिड येथील मुख्य लिपीक पांडुरंग चौधरी यांना उत्कृष्ट महाविद्यालयीन कर्मचारी पुरस्कार, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील पदव्युत्तर शैक्षणिक विभागातील सचिन भरडे यांना उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार तर महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी नुरसबा मुबशीरउद्दीन सय्यद हिचा उत्कृष्ट विद्यार्थिनी पुरस्काराने सत्कार करण्यात येणार आहे.
तसेच विद्यार्थी विकास विभागातर्फे शैक्षणिक सत्र २०१७ - १८ व २०१८ - १९ करीता घेण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन वार्षिकाक पुरस्कारांमध्ये प्रथम क्रमांक गोविंदराव मुनघाटे महाविद्यालय कुरखेडा, द्वितीय महिला महाविद्यालय, गडचिरोली, शैक्षणिक सत्र २०१७ - १८ करीता तृतीय क्रमांक शिवाजी महाविद्यालय राजुरा, २०१८ - १९ मधील उत्तेजनार्थ पुरस्कार श्री ज्ञानेश महाविद्यालय नवरगाव, २०१७ - १९ मधील महात्मा गांधी महाविद्यालय आरमोरी आणि शैक्षणिक सत्र २०१८ - १९ चा पुरस्कार शिवाजी महाविद्यालय गडचिरोली व उत्तेजनार्थ शैक्षणिक सत्र २०१७ - १८ चा पुरस्कार सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर आणि शैक्षणिक सत्र २०१८ - १९ चा पुरस्कार निलकंठराव शिंदे महाविद्यालय भद्रावती यांना देण्यात येणार आहे.
राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे देण्यात येणारा महाविद्यालय रासेयो एकक पुरस्कार विद्यापीठस्तरीय वनश्री महाविद्यालय कोरची, जे.एस.पी.एम. महाविद्यालय धानोरा, सुशिलाबाई रामचंद्र मामीडवार समाजकार्य महाविद्यालय पडोली यांना देण्यात येणार आहे. उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी विद्यापीठस्तरीय वनश्री महाविद्यालय कोरचीचे प्रा. प्रदिप केशव चापले, जे.एस.पी.एम. महाविद्यालय धानोरा चे डाॅ. गणेश चुधरी आणि चंद्रपूर जिल्ह्यातून सुशिलाबाई रामचंद्र मामीडवार समाजकार्य महाविद्यालयाचे डाॅ. सुभाष गिरडे, उत्कृष्ट रासेयो स्वयंसेवक पुरस्कार चंद्रपूर जिल्हा सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूरचे राजेश हजारे, गडचिरोली जिल्हा वनश्री महाविद्यालय कोरची येथील प्रिती राजेश मुलेटी यांना देण्यात येणार असल्याची माहिती कुलसचिव डाॅ. ईश्वर मोहुर्ले यांनी दिली आहे. 

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-26


Related Photos