डोक्यावर ओझे घेऊन जिल्हा परिषदेचे सीईओ पोहचले 'मरकणार' वासियांच्या मदतीला


 - पूरग्रस्तांना केली मदत 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रकाश दुर्गे / अहेरी
: सततच्या पावसाने मागील आठ दिवसापुर्वी भामरागड तालुक्यात सात वेळा आलेल्या पुरामुळे शंभराहून अधिक गावे बाधीत झालीत.
शासन,विविध स्वंयसेवी संघटना व काही माध्यम समुहानी मदतीचा हात पुढे करीत पुरग्रस्ताना मदत केली. अनेक गावापर्यंत स्वतः प्रशासन पोहचले व मदत केली.पण पुरग्रस्त "मरकणार" या गावापर्यंत अजूनपर्यंत कुणाकडुनही पुर्ण  मदत न पोहल्यामुळे जिल्हा परिषद गडचिरोली मार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली मरकणार गावाला मदत पुरविण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.विजय राठोड हे स्वतः डोक्यावर ओझे घेऊन मरकणार येथे पोहचले. 
 भामरागड तालुका मुख्यालयापासून पंचेविस कीलोमीटर अंतरावर असलेल्या "मरकणार" या पुरग्रस्त दुर्गम गावाला दैनंदिन जीवनावश्यक वस्तूची मदत करण्यासाठी जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख एकत्र येत मुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ.विजय राठोड यांच्या पुढाकारातून आवश्यक ती मदत केली. काल (दि.२४) जिल्हा परिषदेतील विभाग प्रमुख व मुख्यकार्यकारी अधिकारी स्वत: सामान घेऊन हेमलकसा येथे (भामरागडला) पोहचले. तिथुन त्यानी काही अंतरावरा पर्यंत गाडीत बसून सामान सोबत नेले.पण काही अंतरावर गेल्यानंतर पुढे वाहने जाणे शक्य नसल्याने सर्व सामान गाडीतून उतरविण्यात आले. मुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ.राठोड यांनी कोणत्याही प्रोटोकॉलची तमा न बाळगता नाल्यापर्यंत स्वत: सामान डोक्यावर घेत चिखलातुन वाहुन नेले. नाल्याच्या  पलीकडे 'मरकणार"येथील ग्रामस्थ ट्रॅक्टर घेऊन आले होते. तिथून त्यांनी सर्व सामान गावात  नेले. 
   याच दरम्यान मुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ.विजय राठोड यांनी पुरग्रस्त कारमपल्ली,कियर व कोठी शाळेला भेट देवून विद्यार्थी, शिक्षक व पालकांशी चर्चा केली. त्यानी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचा वितरण केले.  विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता तपासली व शिक्षकांनाआवश्यक सुचना दिल्यात.स्वत: सीईओ साहेब आपल्या गावात,शाळेत आले हे बघुन सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद आपल्या सर्वांच्या पाठीमागे भक्कमपने उभे आहे. आपल्याला सर्व ती मदत करणार आहे. असे डाॅ. राठोड यांनी सांगितले. यावेळी उपमुख्यकार्यकारी अधिकारी फारेंद्र कुत्तीरकर,मुख्य लेखा वित्तअधिकारी विकास सावंत, उपमुख्यकार्यकारी अधिकारी मानिक चव्हाण,जिल्हा आरोग्य अधिकारी शंभरकर,  जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी बुरले, जिल्हा कृषी अधिकारी कोडाप, शिक्षणाधिकारी राघवेंद्र मुनघाटे, भामरागडचे गटविकास अधिकारी महेश डोके तसेच ग्रामसेवक,शिक्षक व कोतवाल उपस्थित होते.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-25


Related Photos