मिशन भामरागड अंतर्गत आरोग्य विभागाने केली किटकजन्य रोग नियंत्रणाबाबत कार्यवाही


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली  : 
सलग सात ते आठ दिवस पूरपरिस्थितीला तोंड दिलेल्या भामरागड तालुक्यातील जनतेला पूर ओसरल्यानंतर आरोग्य विभागाने "आरोग्य मिशन" भामरागडमध्ये  ११ सप्टेंबर रोजी  दाखल झाले. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी  यांच्या सूचनेनुसार व जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ. शशिकांत शंभरकर  व जिल्हा हिवताप अधिकारी, डॉ.कुणाल मोडक    यांच्या मार्गदर्शनात हिवताप व हत्तीरोग विभागातील कर्मचारी किटकजन्य आजाराच्या रोग प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी सतत ४ दिवस भामरागड येथे कार्यरत होते.
या चमूमध्ये हिवताप विभागाचे आरोग्य सहाय्यक के.एस.राऊत व डी.के. कुनघाडकर तसेच किटकनाशक फवारणी कर्मचारी सोबत हत्तीरोग अहेरी पथकाचे मुक्कावार व त्यांची चमू SFW, FW  व आरमोरी उपपथकातील 4 FW हे सहभागी होते.
पूर परिस्थितीमुळे पुराचे पाणी घरात शिरल्याने कित्येक घरातील जीवनोपयोगी सामान वाहून गेले. गुरे-ढोरे सुद्धा काही प्रमाणात पूरात वाहुन गेले. पूर ओसरल्यानंतर पूराखाली गेलेल्या गावात दुर्गंधी पसरली होती. अशातच सर्व प्रथम फवारणी कर्मचाऱ्यांकडून पूर्ण गाव किटकनाशक फवारणीने फवारुन घेतले गेले. हत्तीरोग कर्मचाऱ्यांकडून मॅलॅथीआन पावडरची डस्टींग २७८ चिखलयुक्त भागात करण्यात आली. सोबतच २३५ व्हेंट पाईपला जाळ्या बांधण्यात आल्या. तसेच अळीनाशक फवारणी अंतर्गत BTI  पावडरची फवारणी करण्यात आली. कर्मचाऱ्यांमार्फत मेडीक्लोरचे द्रावण ३३ विहिरीच्या पाण्यात टाकण्यात येऊन पाणी शुद्धीकरण करण्यात आले.
भामरागड येथील विविध आश्रमशाळा व विद्यालयात किटकजन्य आजाराबाबत डॉ. मोडक जिल्हा हिवताप अधिकारी व आरोग्य सहाय्यक के.एस.राऊत यांनी मार्गदर्शन केले. व किटकजन्य तथा जलजन्य आजारापासून संरक्षण करण्यास सांगितले.  भगवंतराव माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रमशाळा येथे इयत्ता ८ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांना किटकजन्य आजाराची माहिती व उपाययोजना कशी करावी, याबाबत माहिती देण्यात आली. मच्छरदाणीचा वापर होत नसल्याचे निदर्शनास आले. संपूर्ण शाळेत अळीनाशक व किटकनाशक फवारणी करण्यात आली. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वानखेडे व त्यांच्या चमूने मुलांची आरोग्य तपासणी केली. त्यांना RDK  व रक्त नमुने घेण्यास सांगितले.
जि.प. समुह निवासी शाळा येथे भेट देऊन पाहणी केली. तेथे मच्छरदाणीचा वापर करतांना दिसले. परंतू त्यांनाही किटकजन्य आजार नियंत्रणाबाबत माहिती दिली.
शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृह येथे भेट देऊन पाहणी केली. ८  ते बी.ए. पर्यंतची एकुण ५० मुले राहतात. शाळा व कॉलेज सुरु असल्याने मुलांची भेट झाली नाही. समुह निवासी, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय तथा मॉडेल समुह अर्थात त्रिवेणी शाळेत विद्यार्थ्यांना किटकजन्य आजाराची माहिती दिली. शाळेत नियमित आरोग्य तपासणी होत नसल्याचे शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले. किटकनाशक फवारणीची टिम भामरागड, पोयार, कोठी, नेरगुंडा या ठिकाणी फवारणीसाठी ठेवण्यात आली असून पूरग्रस्त भागात फवारणी करणार आहेत. जनतेला सुद्धा संपूर्ण घरे फवारण्याचे आवाहन करण्यात आले. किटकजन्य रोग नियंत्रण व उपाययोजना करुन पूरग्रस्त भामरागड वासियांना आरोग्य सेवा देण्यात आली. या कामात हिवताप व हत्तीरोग कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले.

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-23


Related Photos