ओबीसी आरक्षण, आरोग्य, शिक्षण, सिंचन, शेती, रोजगार अशा प्रमुख मुद्द्यांना घेवून संभाजी ब्रिगेड निवडणूकीच्या रिंगणात


- प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. दिलीप चौधरी यांची माहिती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्ह्यातील कमी करण्यात आलेले ओबीसी आरक्षण पूर्ववत करणे तसेच शिक्षण, सिंचन, शेती, रोजगार अशा प्रमुख मुद्यांना घेवून संभाजी ब्रिगेड राज्यात विधानसभा निवडणूका लढवित असून   जिल्ह्यातील गडचिरोली विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवार रिंगणात उतरविला आहे. राजकारणात चांगल्या लोकांची संख्या वाढवू तरच आपले काही प्रश्न सुटू शकतात. यामुळेच संभाजी ब्रिगेडने निवडणूक लढण्याचे पाउल उचलले आहे, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष तथा गडचिरोली जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. दिलीप चौधरी यांनी आज २२ सप्टेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेतून दिली आहे.
पुढे बोलताना प्रा. चौधरी म्हणाले, संभाजी ब्रिगेड ही आधी एक सामाजिक संघटना होती. आता राजकीय क्षेत्रातही संघटनेने प्रवेश करीत अनेक निवडणूका लढविल्या आहेत. पहिल्यांदाच राज्यातील विधानसभा निवडणूका लढवित असून १३० विधानसभा क्षेत्रात उमेदवार उभे करणार आहे. यापैकी पहिली उमेदवारांची यादी जाहिर करण्यात आली. यामध्ये गडचिरोली विधानसभा क्षेत्राकरीता दिलीप मडावी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 
अनेक राजकीय पक्ष मागील ७० वर्षांपासून त्याच त्या मुद्द्यावर निवडणूका लढवित आले आहेत. यामुळे काही मोजक्याच लोकांचा विकास झाला. आरोग्य, शिक्षण, कृषी अशा प्रमुख मुद्द्यांना सर्वच राजकीय पक्षांकडून बगल देण्यात आली. यामुळे राजकारणाची ही परंपरा बदलण्याची गरज आहे. यासाठी संभाजी ब्रिगेड निवडणूक लढवित असून पैशाच्या बळावर नव्हे तर विकासाचे प्रमुख मुद्दे आणि पक्षाची भूमिका, कार्यकर्त्यांच्या बळावर ही निवडणूक लढवित आहे. अनेक मतदारसंघात लोकशाहीची खरी भूमिका पोहचलेली नाही. यामुळेच आजपर्यंत सर्वसामान्य माणूस लोकशाहीत जिंकला नाही. 
सध्या शेतीपेक्षा व्यावसायीक क्षेत्राला अधिक महत्व दिले जात आहे. यामुळे काही मोजक्याच लोकांचा फायदा होत आहे. जिल्ह्यात ओबीसींच्या आरक्षणाबाबत अनेक आश्वासने दिली जातात. मात्र हा मुद्दा केवळ मतांचे धृवीकरण करण्यासाठी वापरला जात आहे. आदिवासी समाजाला ओबीसींच्या वाट्यातून आरक्षण देण्यात आले. यामुळे ओबीसींचे आरक्षण कमी करण्यात आले. आदिवासी समाजाला आरक्षण देताना मराठा समाजाला ज्याप्रमाणे ५०  टक्के आरक्षणाच्या बाहेर जावून आरक्षण दिल्या गेले त्याप्रमाणे दिले असते तर ओबीसींवर अन्याय झाला नसता. मात्र यावर कोणताही विचार केला गेला नाही. जिल्ह्यातील एकाही लोकप्रतिनिधींनी ओबीसींचा मुद्दा विधानसभेत उपस्थितही केला नाही, असेही प्रा. चौधरी म्हणाले. 
एका रात्रीत अनेक मोठमोठे निर्णय घेतले जाउ शकतात मग ओबीसींच्या मुद्द्यांवर सात दिवसात निर्णय का होउ शकत नाही, असाही प्रश्न प्रा. चौधरी यांनी उपस्थित केला.  
जिल्ह्यातील एस.सी., एस.टी. प्रमाणे ओबीसी व इतर आरक्षित प्रवर्गातील शेतकऱ्यांना शेतीच्या सर्व सोयी - सवलती प्रदान करणे, चिचडोह बॅरेज व इतर धरणांमधून १२ महिने सिंचन सुविधा पुरविणे, कृषी आधारीत , वनाधारीत उद्योग निर्माण करून रोजगार उभारणे, कोनसरी लोहप्रकल्प, आष्टी पेपर मिल उद्योगात स्थानिकांना प्राधान्य, धानोरा, गडचिरोली, चामोर्शी या ठिकाणी एक्स रे, सिटी स्कॅन, इसीजी, ब्लडबॅंक, पॅथालाॅजी या सोयी रूग्णांना मोफत उपलब्ध करणे, शेतीला पूर्णवेळ वीज, गडचिरोली, चामोर्शी, धानोरा , आष्टी येथे अत्याधुनिक ग्रंथालय, अभ्यासिका, व्यायामशाळा, क्रिडांगण उभे करून विद्यार्थ्यांना सुविधा देणे, कुशल कामगारांची गरज लक्षात घेवून आयटीआयमध्ये आवश्यक कौशल्याधारीत अभ्यासक्रम सुरू करून उद्योगात रोजगार देण्याचे प्रयत्न करणे, दारूबंदीची पूर्णपणे अंमलबजावणी, मार्कंडादेव, सेमाना, चपराळा येथे पर्यटनस्थळांचा विकास करणे, गडचिरोलीत इंग्रजी माध्यमाची अत्याधुनिक  शासकीय निवासी शाळा स्थापन करणे अशा प्रमुख मुद्द्यांना घेवून संभाजी ब्रिगेड निवडणूक लढवित असल्याचे प्रा. दिलीप चौधरी यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बहिष्कार किंवा नोटा हा उपाय नाही

मागील  लोकसभा तसेच  विधानसभा निवडणूकीत जिल्ह्यातील अनेक ओबीसी बांधवांनी नोटाचा वापर केला. तसेच बहिष्काराची भूमिका घेतली होती. मात्र आपले प्रश्न मार्गी लावायचे असल्यास निवडणूकीवर बहिष्कार किंवा नोटा चा पर्याय हा उपाय नसून स्थानिक प्रश्नांची जाण असलेल्या व प्रश्न प्रभाविपणे विधानसभेत मांडू शकणाऱ्या व्यक्तीला एकमत करून मतदान करावे. रस्त्यावर उतरणे, मोर्चे, उपोषणे हा आंदोलनाचा भाग असू शकतो. मात्र बहिष्कार किंवा नोटावर मतदान करणे हा आंदोलनाचा भाग नाही, असेही प्रा. दिलीप चौधरी म्हणाले.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-22


Related Photos