कोरची तालुक्यातील निकृष्ट बंधारा प्रकरण : उपविभागीय अभियंता, कनिष्ठ अभियंता व कंत्राटदारावर गुन्हे दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी /  कोरची : 
तालुक्यातील बोरी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील हुडुकदुमा येथे चार महिन्यांपूर्वी बांधण्यात आलेला सिमेंट बंधारा वाहून गेल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर जल व मृद संधारण विभागाचे उपविभागीय अभियंता, कनिष्ठ अभियंता व कंत्राटदारावर कोरची पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
 बोरी ग्रामपंचायतींतर्गत हुडुकदुमा येथे १० टीसीएम क्षमतेचा एक बंधारा जंगलातून येणाऱ्या नाल्यावर लाखोंचा खर्च करुन बांधण्यात आला. कोरची तालुक्यात पड्यालजोब येथे तीन बंधारे, घुगवा येथे दोन, हेटाळकसा पाच, हुडुकदुमा दोन, खसोडाला दोन,काडे दोन असे १६ बंधारे मंजूर करण्यात आले.  सोळाही बधाऱ्यांच्या कामावर कनिष्ठ अभियंता किंवा उपविभागीय अभियंता यांनी कधी भेट दिली नाही. परिणामी कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे काम केले.   हे प्रकरण समोर आल्यानंतर  उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ११ सप्टेंबरला हुडूकदुमा येथे प्रत्यक्ष जाऊन चौकशी केली. त्यात हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे निदर्शनास आले.
उपजिल्हाधिकारी (रोहयो) विजया जाधव व पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता मेश्राम यांनी केलेल्या पाहणीत प्रथमदर्शनी बंधाऱ्याच्या पायाचे काम निकृष्ट असल्याचे स्पष्ट झाले होते. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी उपविभागीय अधिकारी तथा अध्यक्ष जलयुक्त शिवार अभियान समिती कुरखेडा यांना संबंधित कंत्राटदार व यंत्रणेच्या अधिकार्‍याविरुद्ध तातडीने एफआयआर नोंदविण्याचे निर्देश दिले होते. .त्यानुसार उपविभागीय अधिकारी तथा जलयुक्त शिवार अभियान समितीचे अध्यक्ष समाधान शेंडगे यांनी कोरची येथील नायब तहसीलदार रेखा बोके यांना  प्राधिकृत करुन आज कोरची पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी उपविभागीय अभियंता वाय.जी.बरडे, कनिष्ठ अभियंता एम.टी.बरडे व कंत्राटदार शताब कुरेशी यांच्यावर अपराध क्रमांक ४०/१९, भादंवि कलम ४३१, ४०९, ४६८,४७१,४२०,३४ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. कोरचीचे प्रभारी पोलिस अधिकारी विनोद गोडबोले प्रकरणाचा तपास करीत आहेत.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-21


Related Photos