महत्वाच्या बातम्या

 ओबीसी विद्यार्थ्यांकडून शासकीय वसतीगृहात प्रवेशाकरीता अर्ज आमंत्रित


- ओ.बी.सी., व्ही.जे.एन.टी व एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ३६ जिल्ह्यांमध्ये ७२ वसतीगृह सुरू करण्यात येणार असून प्रत्येक जिल्ह्यात मुला-मुलींसाठी प्रत्येकी १०० विद्यार्थी क्षमतेचे २ वसतीगृह सुरू करण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने, ओबीसी कल्याण विभागाकडून विद्यार्थ्यांना शासकीय वसतीगृहात प्रवेशाकरीता ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. ओ.बी.सी., व्ही.जे.एन.टी व एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थी या वसतीगृहात प्रवेशाकरीता अर्ज करू शकतात.

सदर प्रवेश अर्ज सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, सामाजिक न्याय भवन, चंद्रपूर येथे उपलब्ध असून विद्यार्थ्यांना विनामूल्य देण्यात येईल.

चंद्रपूर शहरातील रहिवासी विद्यार्थ्यांना वसतीगृह प्रवेशाकरीता अर्ज घेता येणार नाही. विद्यार्थ्याचे वय ३० वर्षांपेक्षा अधिक नसावे. अर्ज घेतेवेळी विद्यार्थ्यांनी आपली शैक्षणिक मूळ/साक्षाकिंत प्रत (मार्कशीट, टि.सी., जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र) घेऊन येणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याला इयत्ता १२ वीच्या परीक्षेत ६० टक्के गुण असणे अनिवार्य आहे. पालकाची उत्पन्न मर्यादा २.५ लाख असावी. अर्जदार हा इमाव, विजाभज, विमाप्र, आर्थिक मागास प्रवर्गातील असावा. अर्जदार हा व्यवसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम घेणारा असावा.

असे असेल वसतीगृहनिहाय १०० जागांचे आरक्षण : वसतीगृहनिहाय रिक्त जागांमध्ये इतर मागासवर्गाकरीता ४८ जागा, विमुक्त जाती भटक्या जमाती ३१, विशेष मागास प्रवर्ग ६, ईडब्ल्यूएस ४, दिव्यांग ४, अनाथ २ तर खास बाबीसाठी ५ अशा प्रत्येक वसतीगृहात १०० जागा राहणार आहेत.

असे राहील वेळापत्रक : २० फेब्रुवारी ते ५ मार्च दरम्यान अर्ज वाटप व स्वीकारणे. १५ मार्च रोजी पहिली निवड यादी प्रसिद्ध करणे. २५ मार्च पहिल्या निवड यादीनुसार प्रवेशाची अंतिम मुदत राहील. २८ मार्च रोजी दुसऱ्या यादीमधील विद्यार्थ्यांची निवड यादी प्रसिद्ध करणे आणि ५ एप्रिल २०२४ रोजी दुसऱ्या यादीमधील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे.

तरी ओ.बी.सी.,व्ही.जे.एन.टी व एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी सदर वसतीगृहातील प्रवेशाकरीता अर्ज सादर करावे, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos