हवामान बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम, रुग्णालयांमध्ये होत आहे गर्दी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी / गडचिरोली : 
ढगाळ वातावरण, अधून-मधून होणारा पाऊस अशा  हवामानामुळे साथीच्या आजारांसह सांधेदुखी, डोकेदुखी, अंगदुखी आणि पोटदुखीचा त्रास वाढला आहे. विशेषत: लहान मुले आणि ज्येष्ठांना याचा अधिक त्रास होत असून ताप, थंडी, सर्दी, खोकला आणि कफ अशी लक्षणे असलेल्या मुलांची संख्या अधिक आहे. त्यामुळे पालकांनी मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. तर जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी पाहयला मिळत आहे. 
मागील २ महिन्यांपासून राज्यात स्वाईन फ्लू, मलेरिया, डेंग्यु या आजारांना पोषक वातावरण असल्यामुळे   जिल्ह्यात या आजारांचा प्रादुर्भाव वाढत आहे. भामरागडमध्ये नुकतीच पूर परिस्थिती ओसरली असून  काही ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. या ठिकाणी विविध संस्था आरोग्य सेवा पुरवत आहेत.  तसेच हवामान बदलामुळे त्वचा, डोळे आणि केसांच्या समस्या वाढलेला आहेत. त्वचा किंवा डोळे कोरडे पडणे, खाज सुटणे अशा तक्रारी वाढल्या आहेत.
हवामानातील बदलामुळे बालकांमध्ये सर्दी, ताप, खोकला आणि कफ होत असल्याच्या तक्रारी अधिक आहे. त्यामुळे पालकांनी मुलांना स्वच्छ आणि पूर्ण कपडे घालावे. डास चावणार नाही याची काळजी घ्यावी. या दिवसात बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. विशेषत: एक दिवसाच्या बाळापासून ३ वर्षांपर्यंतच्या मुलांची अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-21


Related Photos