जि.प. ला कोट्यवधींनी गंडविल्याचे प्रकरण, मोठे रॅकेट असण्याची शक्यता


- बॅंक अधिकाऱ्यांचीही चौकशी व्हावी
- केवळ आधार कार्ड जोडून उघडल्या गेले बॅंकेत खाते
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली
: जिल्हा परिषदेच्या सिंचाई विभागाच्या बॅंक ऑफ युनियन मधील खात्यातून तब्बल २ कोटी ८६ लाख १३ हजार ८५१ रूपयांच्या गैरव्यवहाराचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल करून तपास सुरू केला असून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी खोट्या सह्या, खोटे पत्र, खोटे धनादेश तयार करणारा व्यक्ती तसेच बॅंक अधिकाऱ्यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.  मोठी तयारी करून  ही रक्कम वळती करण्यात आली असून यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. 
शासनाकडून मिळणारी रक्कम गडचिरोली येथील युनियन बॅंकेच्या शाखेत जमा केली जात होती. या खात्यात जे काही व्यवहार केले जात होते त्याबाबत दर तीन महिन्याला लेखाजोखा तपासण्यात येत होता. या महिन्यात सिंचाई विभागाच्या वतीने खात्याची चौकशी केली असता खात्यातून २ कोटी ८६ लाख १३ हजार ८५१ रूपये गहाळ असल्याचे निदर्शनास आले. या बाबीची शहनिशा केल्यानंतर बॅंकेत एक धनादेश जमा करण्यात आल्याचे दिसून आले. बॅंकेतील धनादेश ज्या क्रमांकाचा आहे त्याच क्रमांकाचा धनादेश जिल्हा परिषदेकडे आहे. यामुळे बॅंकेतील धनादेश बनावट तयार केल्याचे निदर्शनास आले. या धनादेशावर अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. तसेच कार्यालयाचे रितसर पत्रसुध्दा तयार करून जोडण्यात आले. ६ जून रोजी बॅंकेत धनादेश जमा करण्यात आला. यानंतर १० जून २०१९ रोजी सदर रक्कम वेगवेगळ्या खात्यात वळती करण्यात आली . ही बाब १० सप्टेंबर रोजी युनियन बँकेच्या खात्याची चौकशी केल्यानंतर  निदर्शनास आली.  बनावट सह्या आणि बनावट धनादेशाद्वारे रक्कम गहाळ करण्यात आल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर जिल्हा जलसंधारण अधिकारी भुमेश दमाहे यांनी काल १९ सप्टेंबर रोजी गडचिरोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी कलम ४२० , ४६५, ४८६, ४७१ , ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. 

रक्कम वळती झालेले खातेही बनावट असण्याची शक्यता

जि.प.च्या सिंचाई विभागाच्या खात्यातून आरटीजीएसद्वारे पाच खात्यांमध्ये वळती करण्यात आली. यामध्ये चंद्रपूर येथील ३ आणि वर्धा येथील दोन बॅंकांचा समावेश आहे. यापैकी महाराष्ट्र बॅंकेच्या दोन खात्यात, अलाहाबाद बॅंक, आंध्रा बॅंक व आनंद नागरी सहकारी संस्था चंद्रपूर या बॅंकांमध्ये एका कंपनीच्या नावे असलेल्या खात्यावर रक्कम वळती करण्यात आली आहे. या बँकांमध्ये फेब्रुवारी २०१९ मध्ये हे खाते उघडण्यात आले.  बॅंकांमध्ये खाते उघडण्यासाठी केवळ आधार कार्डचा वापर करण्यात आला आहे. आधार कार्डऐवजी इतर कोणतेही एस्तऐवज या बॅंकांकडे आढळून आले नाहीत, अशी माहिती प्राप्त झाली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा माग काढण्यासाठी गडचिरोली पोलिस चंद्रपूर येथे पोहचले होते. बॅंकांमध्ये चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. 
जिल्हा परिषदेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. तसेच सबंधितांची चौकशी केली जात आहे. या प्रकरणात बॅंकेच्या अधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात चुका असण्याची शक्यता असून त्यांच्यावरही कारवाई होउ शकते. जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा असून याआधी भंडारा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमध्ये अशाप्रकारचा घोटाळा उघडकीस आला होता. संपूर्ण प्रकरणाचा योग्य तपास करून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, अशी माहिती प्राप्त झाली आहे. पुढील तपास पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलिस अधीक्षक डाॅ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक प्रदिप चौगावकर करीत आहेत.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-20


Related Photos