'चांद्रयान २' ला ठरवून देण्यात आलेले वैज्ञानिक प्रयोग अपेक्षेप्रमाणे पूर्ण होतील : इस्रो


वृत्तसंस्था /  पुणे : 'चांद्रयान २' या चंद्राभोवती फिरणाऱ्या कक्षायानावरील (ऑर्बिटर) सर्व आठ वैज्ञानिक उपकरणांचा वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे. यानावरील सर्व उपकरणे उत्तमरीत्या काम करीत असून, 'चांद्रयान २' ला ठरवून देण्यात आलेले वैज्ञानिक प्रयोग अपेक्षेप्रमाणे पूर्ण होतील, असे निवेदन गुरुवारी भारतीय अवकाश संशोधन संस्थेतर्फे (इस्रो) देण्यात आले. 
विक्रम लँडरशी संपर्काशी शक्यता मावळलेली असताना, लँडरशी संपर्क का तुटला याची कारणमीमांसा तज्ज्ञांची राष्ट्रीय समिती करीत असल्याची माहितीही 'इस्रो'ने दिली आहे.
विक्रम लँडर उतरलेल्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात येत्या  २१ सप्टेंबर रोजी  १४ दिवसांची रात्र सुरू होत आहे. त्यानंतर अतिथंड तापमानात लँडरवरील यंत्रणा काम करण्याची शक्यता नसल्यामुळे त्याच्याशी संपर्क करणे शक्य होणार नाही. अशा स्थितीत 'इस्रो'कडून विक्रम लँडरसंबंधी काही अधिकृत माहिती समोर येते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, गुरुवारी 'इस्रो'ने 'विक्रम'च्या स्थितीऐवजी चंद्राभोवती फिरणाऱ्या 'चांद्रयान २'च्या आरोग्याविषयी माहिती जारी केली. 'इस्रो'च्या निवेदनानुसार, चांद्रयान २ ऑर्बायटरवरील सर्व वैज्ञानिक उपकरणे सुरू करण्यात आली असून, त्यांच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. सर्व वैज्ञानिक उपकरणांची कामगिरी अपेक्षेप्रमाणे असून, ऑर्बायटरला ठरवून दिलेले वैज्ञानिक प्रयोग उत्तमरीत्या पार पाडले जातील.'
विक्रम लँडरचा संपर्क तुटण्याचे नेमके कारण शोधण्यासाठी विविध विषयांचे तज्ज्ञ आणि इस्रोमधील शास्त्रज्ञांची राष्ट्रीय समिती नेमण्यात आली असून, त्या समितीतर्फे माहितीचे विश्लेषण करण्यात येत आहे, असेही 'इस्रो'ने नमूद केले आहे.  Print


News - Rajy | Posted : 2019-09-20


Related Photos