सर्च मध्ये सुरु झाली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची एटीएम सेवा


-  रुग्णांना मिळणार लाभ : दुर्गम भागातील पहिलेच ऑफसेट एटीएम
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  गडचिरोली :
धानोरा तालुक्यातील सर्च या आरोग्यसेवी संस्थेत गडचिरोली डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटीव्ह बँकेची एटीएम सेवा सुरू करण्यात आली. १७ सप्टेंबर रोजी सर्च च्या संस्थापक डॉ. राणी बंग यांच्या हस्ते या एटीएम चे उद्घाटन झाले.
  आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्ष म्हणून सर्च चे संस्थापक डॉ. अभय बंग तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. राणी बंग, जीडीसीसी बँकेचे ज्येष्ठ संचालक अरविंद सावकार पोरेड्डीवार आणि बँकेचे मानद सचिव अनंत साळवे उपस्थित होते. सर्वप्रथम डॉ. राणी बंग यांच्या हस्ते फीत कापून एटीएम मशीन सेवा शोधग्रामवासी व दवाखान्यात येणार्‍या रुग्णांसाठी लोकार्पित करण्यात आली. सर्वप्रथम बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांनी बँकेच्या एटीएम प्रणालीविषयी माहिती दिली. सर्च मध्ये सुरू झालेले बँकेचे हे ३२ वे एटीएम असून त्यातही जिल्ह्यातील पहिले ऑफसाईट एटीएम असल्याचेही त्यांनी सांगितले.
अरविंद पोरेड्डीवार यांनी बँकेची सुरुवात, दुर्गम भागात कार्यालये सुरू करताना आलेल्या अडचणी याविषयी आपल्या मनोगतात सांगितले. सर्च सारख्या दुर्गम भागात एटीएम सुरू करण्याची कल्पनाही आम्ही कधी केली नव्हती. पण आज सत्यात उतरल्याचे ते म्हणाले. अनेक चढ उतार बँकेने पहिले. प्रत्येक प्रसंगी डॉ. बंग दाम्पत्य बँकेच्या आणि पोरेड्डीवार कुटुंबाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिल्याचे ते मनोगतात म्हणाले. रुग्णांना आणि शोधग्रामवासीयांना या एटीएम चा खूप फायदा होणार असल्याचे डॉ. राणी बंग यावेळी म्हणाल्या. पोरेड्डीवार परिवाराशी बालपणापासून असलेल्या जिव्हाळ्याच्या आठवणी सांगत एटीएम साठी त्यांनी आभार व्यक्त केले.
अध्यक्षीय मनोगतात डॉ. अभय बंग म्हणाले, या आदिवासी भागातील लोकांचा आर्थिक प्रवास वस्तुविनिमय व्यवहारापासून पैशाच्या व्यवहारात झाला आहे. आदिवासी समाजही बदलला आहे. पैशाच्या व्यवहारातून सुटका नाही ही वस्तुस्थिती त्यानेही स्वीकारून आर्थिक व्यवहार करायला हा समाज शिकला आहे. दररोज जवळपास २०० रुग्ण मा दंतेश्वरी दवाखान्यात येतात. येथील रहिवाशांनाही आर्थिक व्यवहार करावे लागतात. त्यामुळे या एटीएम चा सर्वांना खूप लाभ मिळणार आहे. सर्च ची स्थापना झाल्यावर १९८६ पासून जवळपास सहा वर्ष संस्थेचे पहिले कार्यालय हे देखील पोरेड्डीवार यांचे तेंदूपत्त्याच्या गोदामात होते. त्यामुळे पोरेड्डीवार परिवाराशी आणि जीडीसीसी बँकेशी सर्च ची नाळ आधीपासूनच जुळलेली आहे. ती या एटीएम मशीन मुळे आणखी घनिष्ट झाल्याची भावना डॉ. बंग यांनी व्यक्त केली. बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, डॉ. आनंद बंग आणि सर्च चे उपसंचालक तुषार खोरगडे यांच्या प्रयत्नांनी सदर एटीएम सेवा सुरू झाली. कार्यक्रमाचे संचालन सुयश तोष्णीवाल यांनी केले. आभार भुवन केळझरकर यांनी मानले. सर्च मधील कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.     Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-19


Related Photos