पुलाच्या मागणीसाठी कुंभी मोकासा व माडेमुल वासीयांचा निवडणूकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा


- पावसाळ्यात तुटतो जिल्हा मुख्यालयापासून १० किमी अंतरावरील दोन्ही गावांचा संपर्क
- पुलाअभावी दोन विद्यार्थी गेले वाहून
- ग्रामस्थांची अवस्था ‘इकडे आड - तिकडे विहिर’
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली
: जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या १० किमी अंतरावर असलेल्या कुंभी मोकासा व माडेमुल या गावांना जाणाऱ्या मार्गावर असलेल्या पोटफोडी नदीवर पुल नसल्यामुळे दोन्ही गावांची वाट बिकट असून वारंवार मागणी करूनही पुलाचे बांधकाम केले जात नसल्याने गावांची अवस्था दयनीय झाली आहे.  पुल निर्माण करावा, अन्यथा सर्वच निवडणूकांवर बहिष्कार टाकू असा इशारा नागरीकांनी पत्रकार परिषदेतून दिला आहे.
३५० ते ३७५ इतकी लोकसंख्या असलेल्या कुंभी मोकासा हे गाव विकासापासून कोसोदूर आहे. गावालगत असलेली पोटफोडी नदी गावासाठी कर्दनकाळ ठरली आहे तर गावाच्या इतर बाजूस केवळ जंगल आणि टेकड्या आहेत. यामुळे गावातील नागरीकांना बाहेर पडणे कठीण झाले आहे. यावर्षी आलेल्या सततच्या पावसामुळे नागरीकांचे जगणे कठीण झाले आहे.  मात्र प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी याकडे दूर्लक्ष केले असल्याचे ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पोटफोडी नदीवर पुल नसल्यामुळे २०१६ - १७ मध्ये चांदाळा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असलेला इयत्ता पाचव्या वर्गातील विद्यार्थी वाहून गेला होता. तर २१ ऑगस्ट रोजी इयत्ता तिसरीमध्ये शिक्षण घेत असलेला हेमंत केशव निकुरे हा विद्यार्थीसुध्दा वाहून गेला. हेमंत निकुरे हा वाहून गेल्याची माहिती तहसील आणि पोलिस प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन कक्षास देण्यात आली होती. मात्र कोणतीही मदत मिळाली नाही. गावकऱ्यांना जीव मुठीत घेवून रात्रभर त्याच्या प्रेताचा शोध घ्यावा लागला, असे गावकऱ्यांनी सांगितले. २०१५ - १६ मध्ये निकेश बांबोळे या शेतकऱ्याची बैलजोडीसुध्दा वाहून गेली होती. माडेमुल जवळील पुलावरूनही एक इसम वाहून गेला होता. 
नदीवर पुल नसल्यामुळे कुंभी गावातील रूग्ण व गरोदर मातांना वैद्यकीय सोयी - सुविधा मिळत नाहीत. परिणामी मार्गच बंद असल्यामुळे मृत्यूलाही सामोरे जावे लागते. अनेकदा रूग्णांना पाण्याच्या प्रवाहातूनही खाटेच्या सहाय्याने बाहेर काढण्याची पाळी आली होती. गावातील नागरीकांच्या आरोग्याच्या समस्येसोबतच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानसुध्दा होते. गावात केवळ चौथीपर्यंत शिक्षणाची सोय आहे. गावातील शाळेची इमारतसुध्दा मोडकडीस आली आहे.यामुळे २० ते २५ विद्यार्थी चांदाळा व गडचिरोली येथे शिक्षणासाठी जातात. मात्र नदीतील पाण्याच्या प्रवाहामुळे त्यांना शिक्षण घेणेही कठीण झाले आहे. शाळेच्या इमारतीबाबतही सार्वजनिक बांधकाम विभागास माहिती देण्यात आली तरीही दूर्लक्ष करण्यात आल्याने विद्यार्थी जीव मुठीत घेवून शिक्षण घेत आहेत.
नदीला पूर येत असल्यामुळे शेतकऱ्यांचेही अतोनात नुकसान झाले आहे. शेतीच्या नुकसानीबाबत प्रशासनाला कळविण्यात आले. मात्र कोणताही अधिकारी फिरकून पाहत नाही. तलाठी, कृषी सहाय्यक सुध्दा गावात कधी येत नाहीत. यामुळे नुकसानीचे कुठलेही पंचनामे झालेले नाहीत. 
पुढे माहिती देताना नागरीक म्हणाले, पोटफोडी नदी गावापासून केवळ १०० मीटर अंतरावर आहे.  २००२ मध्ये पुलाची मागणी करण्यात आली होती. पंचायत समितीच्या आमसभेत ठराव घेवून पुलाला मंजूरीसुध्दा मिळाली होती. मात्र त्यावेळीच्या आमदारांनी   काम रद्द केले. यानंतर जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा केल्यानंतर २००४ मध्ये सिमेंट पाईपच्या सहाय्याने रपटा तयार करण्यात आला.  हा रपटा लहान असल्यामुळे पावसाळ्यात कोणताही उपयोग होत नाही. पुलाच्या मागणीसाठी लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला असता केवळ भुलथापा देतात. निवडणूकीच्या काळात गावात येवून मते मागण्यापूरते आश्वासने देतात. मात्र निवडणूकानंतर कुणीही फिरकून  पाहत नाहीत. यामुळे आता आगामी विधानसभा निवडणूकीपूर्वी पुलाचा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा विधानसभा सह आगामी ग्रामपंचायत तसेच सर्वच निवडणूकांवर बहिष्कार टाकू असा इशारा नागरीकांनी दिला आहे.
पत्रकार परिषदेला हिरापूरच्या सरपंचा पुष्पा सुरेश सोनुले, यश्वगिता गेडाम, देविदास मोहुर्ले, विजय मडावी, निवृत्ता नैताम, वैशाली सोनुले, डिंपल बांबोळे, सविता तोरे, चेतना नैताम यांच्यासह कुंभी मोकासा व माडेमूल येथील शेकडो नागरीक उपस्थित होते.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-19


Related Photos