महत्वाच्या बातम्या

 राज्यात दीड लाख विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अर्जाकडे पाठ : १५ मार्चपर्यंतची मुदतवाढ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / छत्रपती संभाजीनगर : केवळ आर्थिक परिस्थितीमुळे अनुसूचित जाती, नवबौद्ध समाजातील गरीब, होतकरू विद्यार्थ्यांच्या उच्चशिक्षणात अडचण येऊ नये म्हणून भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना राबविली जाते.

मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासंदर्भात अनेक विद्यार्थ्यांमध्ये गांभीर्य दिसत नाही. मागील वर्षाच्या तुलनेत आतापर्यंत राज्यातील २ लाख ७३ हजार ६४२ विद्यार्थ्यांनीच शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरले असून अद्याप सुमारे दीड लाख जणांनी अर्जच भरलेले नाहीत, तर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांची ही आकडेवारी ३७ हजार १४४ एवढी आहे.

आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेता यावे, यासाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामार्फत मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. गेल्या शैक्षणिक वर्षात राज्यातील ३४ जिल्ह्यांतील ४ लाख १७ हजार ४८९ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज केले होते. यंदा चालू शैक्षणिक वर्षासाठी शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी ऑक्टोबर २०२३ मध्ये महाडीबीटी पोर्टल सुरू करण्यात आले. तेव्हापासून अर्ज भरण्यासाठी समाज कल्याण विभागाकडून सातत्याने मुदतवाढ देण्यात आली, तरीही राज्यातील १ लाख ४३ हजार ८४७ विद्यार्थ्यांनी अजून अर्जच केलेले नाहीत.

दरम्यान, शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी या विद्यार्थ्यांकडे महाविद्यालयांनी पाठपुरावा करणे गरजेचे आहे. महाविद्यालयांच्या लॉगिनवर प्राप्त अर्जांची छाननी केल्यानंतर परिपूर्ण अर्ज समाज कल्याण सहआयुक्त कार्यालयाकडे (जिल्हास्तरीय) फाॅरवर्ड करणे गरजेचे असताना सद्य:स्थितीत त्यांच्याकडे १ लाख २ हजार ४०२ अर्ज छाननीविना पडून आहेत. आता शैक्षणिक वर्षाचे दुसरे सत्र संपुष्टात येण्यासाठी काही महिनेच शिल्लक आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वच समाज कल्याण सहायक आयुक्तांनी महाविद्यालयांना तंबी दिली की, शिष्यवृत्तीपासून एकही विद्यार्थी वंचित राहिला, तर त्याची सर्व जबाबदारी महाविद्यालयांचीच राहील. यासाठी आता विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी ५ मार्च, तर महाविद्यालयांनी लॉगिनवर प्राप्त अर्ज समाज कल्याण कार्यलयाकडे फॉरवर्ड करण्यासाठी १५ मार्चपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे.

मराठवाड्यातील प्रलंबित अर्जाची स्थिती
जिल्हा- महाविद्यालयांकडे प्रलंबित अर्ज
छत्रपती संभाजीनगर - ७ हजार ६३८
जालना- २ हजार ८१०
बीड- ४ हजार ४६
उस्मानाबाद- १ हजार ३३५
लातूर- ३ हजार ३४५
नांदेड- ५ हजार ४२६
परभणी- १ हजार ५४६
हिंगोली- १ हजार ३१६





  Print






News - Rajy




Related Photos