अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीचे सर्व्हे करण्यास विमा कंपनीची टाळाटाळ


- सर्व्हे  करून नुकसानभरपाई देण्याची गोपाल भांडेकर यांची मागणी
विदर्भ न्यूज एक्सपे्रस
तालुका प्रतिनिधी / आरमोरी :
तालुक्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. शासनाच्या आवाहनानुसार शेतकऱ्यांनी पीकविमा काढला होता. यामुळे  नुकसानभरपाई मिळण्यासाठी विमा कंपनीकडे अर्ज करून शेतीचे सर्व्हे  करण्याची मागणी केली. मात्र विमा कंपनीने सर्व्हे  करण्यास टाळाटाळ सुरू केली असून अद्यापही मोका चौकशी केलेली नाही. यामुळे शेतीचे सर्व्हे  करून नुकसानग्रस्तांना विम्याचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी गोपाल भांडेकर यांनी केली आहे.
आरमोरी तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाउस झाला. तसेच अनेक दिवस पुरपरिस्थिती होती. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. काहींचे संपूर्ण शेत नष्ट झाले. यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पीक विता उतरविला आहे अशा शेतकऱ्यांनी विमा एजंटकडे लाभ मिळण्यासाठी अर्ज केला. मात्र विमा एजंट हे तालुका कृषी कार्यालयात एखाद्या वेळीच येतात आणि त्यांच्याशी संपर्क केला असता ते प्रतिसादही देत नाहीत. अनेक शेतकऱ्यांनी २० ऑगस्ट पूर्वी अर्ज केला असताना सुध्दा नियमानुसार १५ दिवसांच्या आत मोका चौकशी करणे आवश्यक आहे. असे असतानाही एक महिन्यापेक्षा अधिक कालावधी लोटूनही विमा कंपनीकडून चौकशी करण्यात आलेली नाही. शासनाकडून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी विमा उतरवावा, पिकांना सुरक्षा कवच द्यावे याकरीता मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यात आला. मात्र विमा कंपन्यांच्या उदासिनतेमुळे ही योजना सपशेल फेल ठरत असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांना लाभापासून वंचित राहण्याची पाळी आली आहे. यामुळे शासन व प्रशासनाने तसेच जिल्हाधिकारी यांनी स्वतः लक्ष देवून शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी गोपाल भांडेकर यांनी केली आहे.

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-18


Related Photos