कंबालपेठा येथील नागरकांसाठी त्रासदायक ठरलेले कुक्कूटपालन केंद्र स्थानांतर करा


- १०० हून अधिक नागरीकांचे आरोग्य बिघडले
- आमदार राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम यांना नागरीकांचे निवेदन
विदर्भ न्यूज एक्सपे्रस
प्रतिनिधी / अंकीसा :
सिरोंचा तालुक्यातील ग्रामपंचायत अंकीसा माल अंतर्गत येत असलेल्या कंबालपेठा गावातील माजी उपसरपंच वेंकटेश्वरराव येनगंटी यांनी कुक्कूटपालन केंद्र सुरू केले आहे. मात्र या कुक्कूटपालन केंद्राच्या दुर्गंधीमुळे गावातील नागरीकांना आजारांची लागण होत असून हे केंद्र तातडीने अन्य ठिकाणी  हलविण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी नागरीकांनी अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
कंबालपेठा येथे येनगंटी यांनी अंदाजे २० हजार कोंबड्यांचे कुक्कूटपालन केंद्र सुरू केले आहे. कोंबड्यांच्या विष्टेमुळे संपूर्ण गावात दुर्गंधी पसरली आहे. सदर कुक्कूटपालन केंद्र लोकवस्तीच्या २० ते ४० मीटर अंतरावर आहे. यामुळे लहान बालके, वृध्द नागरीक आजारी पडत आहेत. यापुढे रूग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या गावात जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी केंद्र आहे. मात्र दुर्गंधीमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. येनगंटी यांनी उपसरपंच असताना पदाचा दुरूपयोग करून कंबालपेठा येथील नागरीकांना विश्वासात न घेता कुक्कूटपालन केंद्र सुरू केले. तसेच अवैधरीत्या विद्युत पुरवठा घेवून केंद्र चालविले जात आहे. गावातील लोकसंख्या ५०० असून येथील नागरीक मोलमजूरी करून उदरनिर्वाह करतात. बहूतांश लोकांना आजाराची लागण झाल्यामुळे त्यांच्यासमोर उपचार करण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. नागरीक मृत्यूमुखी पडण्याची शक्यता आहे. यामुळे या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
आमदार आत्राम यांनी माहिती जाणून घेतली असता तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. कन्नाके हे दोन दिवसांपासून गावात येवून उपचार करीत असल्याची माहिती मिळाली. तसेच पशुधन अधिकारी डाॅ. गायकवाड यांनी कुक्कूटपालन केंद्राची चौकशी केली आहे. याबाबत तहसीलदारांना अहवाल पाठविण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-18


Related Photos