राज्यात स्वाइन फ्लूची साथ, नऊ महिन्यांमध्ये २१२ जणांचा घेतला बळी


वृत्तसंस्था / मुंबई : राज्यामध्ये स्वाइन फ्लूच्या साथीने गेल्या नऊ महिन्यांमध्ये   २१२ जणांचा बळी घेतला आहे. त्यात १८ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या एका महिन्याच्या कालावधीमध्ये तब्बल १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर नाशिकमध्ये ३३ जणांना स्वाइनची लागण होऊन जीव गमवावा लागला आहे.
नाशिकसह मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर, अहमदनगर येथे स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले आहेत. नऊ महिन्यांत दोन हजार २०७ स्वाइन फ्लूच्या रुग्णांची नोंद झाली असून, राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये ९० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्याच्या संसर्गजन्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार १ जानेवारी ते १८ सप्टेंबर या कालावधीमध्ये राज्यात सुमारे २१ लाख १८ हजार २७० स्वाइन फ्लूच्या संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली.
स्वाइन फ्लूच्या साथीचा प्रभाव हा एक वर्षाआड अधिक असतो, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. २०१८ मध्ये २०१७च्या तुलनेत स्वाइन फ्लूचा विळखा काहीसा कमी होता. मात्र यावर्षी पुन्हा या आजाराने डोके वर काढले आहे. २०१७मध्ये ६१४४ रुग्णांना फ्लूची लागण झाली होती आणि यातील सुमारे १३ टक्के रुग्ण दगावले होते. त्या तुलनेत २०१८मध्ये रुग्णांची संख्या जवळपास ५७ टक्क्यांनी कमी झाली असून २,५९४ स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले होते. मात्र, त्या तुलनेत मृत्यूची संख्या वाढली असून, ती १३ वरून १८ टक्क्यांवर पोहोचली होती.
हा संसर्गजन्य आजार टाळण्यासाठी फ्लू बरा होईपर्यंत गर्दीमध्ये जाणे टाळा, शिंकताना रुमालाचा वापर करा, कोणत्याही प्रकारचा ताप अंगावर काढू नका, असे आवाहन  आरोग्य विभागाने केले  आहे.

   Print


News - Rajy | Posted : 2019-09-18


Related Photos