पाकव्याप्त काश्मीर निश्चितपणे एक दिवस भारताचा भौगौलिक हिस्सा असेल : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर


वृत्तसंस्था /  नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे आणि निश्चितपणे एक दिवस हा भाग भारताचा भौगौलिक हिस्सा असेल, असा ठाम विश्वास आज परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी व्यक्त केला. शेजारी देश जोपर्यंत दहशतवादाला खतपाणी घालणे बंद करत नाही, तोपर्यंत कोणत्याही प्रकारची चर्चा होऊ शकत नाही, असेही जयशंकर यांनी पाकिस्तानला ठणकावले.
मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वाला १०० दिवस पूर्ण झाले आहेत. या निमित्ताने जयशंकर यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या १०० दिवसांतील कारभाराचा लेखाजोखा मांडला. पाकिस्तान हे एक 'यूनिक चॅलेंज' असल्याचे नमूद करत पाकिस्तानने सामान्य शेजाऱ्याप्रमाणे वागायला हवे व सीमेवरील दहशतवाद पूर्णपणे थांबवायला हवा तरच पाकसोबतचे संबध पुन्हा सुधारू शकतील, असे जयशंकर यांनी बजावले. पाकिस्तान दहशतवाद पोसत आहे. शेजारी देशांमध्ये दहशतवादी कारवायांसाठी रसद पुरवत आहे. अशा स्थितीत कोणतीही चर्चा शक्य नाही, असेही जयशंकर म्हणाले.
पाकिस्तानमध्ये कैद असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्याबाबत विचारले असता, जाधव यांना न्याय मिळावा व एका निर्दोष भारतीयाची पाकच्या तावडीतून मुक्तता व्हावी म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत, असे जयशंकर म्हणाले. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा निर्णय ही भारताची अंतर्गत बाब असल्याचे एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले.  Print


News - World | Posted : 2019-09-17


Related Photos