२५ सप्टेंबर पर्यंत बँकेचे व्यवहार आवरा ; आठवडाभर बँका राहणार बंद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
केंद्र सरकारने दहा सरकारी बँकांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याविरुद्ध बँक अधिकाऱ्यांनी येत्या २६ आणि २७ सप्टेंबरला संप पुकारला असून, २८ सप्टेंबर ला चौथा शनिवार व २९ सप्टेंबर रविवार असे सुटीचे दिवस आहेत . तर सोमवार ३० सप्टेंबर व मंगळवार १ ऑक्टोबर असे दोन दिवस बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यानंतर लगेच २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त बँकांना सुटी राहील. संप आणि सुट्या मिळून आठवडाभर बँका बंद राहणार आहेत. तेव्हा महिन्याअखेरीस बँकेशी संबंधित कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण व्यवहार करायचे असल्यास ते २५ सप्टेंबरपर्यंत केल्यास खातेधारकांना होणारा मन:स्ताप वाचू शकेल.
केंद्र सरकारने देशातील दहा बँकांचे विलीनीकरण करून चार मोठ्या बँका करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि ओरिएंटल बँकेचे पंजाब नॅशनल बँकेत विलीनीकरण होईल. तर सिंडिकेट बँकेचे कॅनरा बँकेत, अलाहबाद बँक इंडियन बँकेत आणि आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँक युनियन बँकेत विलीन होईल. या निर्णयाला ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉनफेडरेशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन, इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस आणि नॅशनल ऑर्गेनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स यांनी विरोध दर्शविला आहे. त्यामुळे या निर्णयाच्या निषेधार्थ संपाचे हत्यार उपसण्यात आले आहे. या संपाला सर्व संघटनांचा पाठिंबा लाभला आहे. संपूर्ण देशभरात संप पुकारण्यात आला आहे. त्याचा फटका ग्राहकांना बसणार आहे. एक आठवडा बँक बंद राहणे अडचणीचे ठरणार असून संप मागे घेण्यासाठी बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संघटनेवर सरकारतर्फे दबाव आणण्याचे प्रयत्न करण्यात येण्याची शक्यता आहे. सरकारने संघटनांच्या मागणीवर सकारात्मक भूमिका घेण्याची तयारी दर्शविल्यास संप मागे घेण्याचा अंदाज आहे. दरम्यान, बँका बंद राहणार असल्याने एटीएमवर ताण पडणार आहे.
  Print


News - Nagpur | Posted : 2019-09-17


Related Photos