पुरग्रस्तांना सावरू द्या, मगच निवडणूका घ्या!


- आताच निवडणूका झाल्यास पुरग्रस्तांवर होणार अन्याय
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
मागील महिनाभरापासून राज्याला पावसाने झोडपून काढले. यामुळे अनेक भाग पुरामुळे अस्ताव्यस्त झाला आहे. काही भागातील नागरीकांना या परिस्थितीमधून सावरण्यासाठी आणखी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. सध्या लोकांपुढे आपले उध्वस्त झालेले संसार उभे करण्याचा प्रश्न आहे. विविध संस्था, संघटना या नागरीकांना अजूनही सावरण्यासाठी मदत करीत आहेत. अशा परिस्थितीत पुरग्रस्तांची मनस्थिती लक्षात घेता आगामी विधानसभा निवडणूका पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी आता जनसामान्यांमधून होऊ  लागली आहे.
निवडणूका जाहिर झाल्यास अनेक विद्यमान नेते, राजकारणी पुरग्रस्तांपर्यंत पोहचणार नाही. राजकीय बैठका, गुप्त दौरे अशा कामांना प्राधान्य दिले जातील. यामुळे पुरग्रस्तांचा विचार त्यांनाही करता येणार नाही. तसेच प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी सुध्दा निवडणूकीच्या कामात गुंततील.  यामुळे पंचनामे, मदत पोहचविणे अशा कामात हयगय होण्याची शक्यता आहे. सध्या पूरग्रस्तांसाठी देवदूत ठरणारे पोलिससुद्धा निवडणुकीच्या बंदोबस्तात लागतील,  यामुळे पुरग्रस्तांवर अन्याय होउ शकतो, असेही मत व्यक्त केल्या जात आहे. 
मागील महिन्यात सांगली आणि कोल्हापूरला पुराने नेस्तनाबूत केले. या दोन्ही जिल्ह्यात अनेकांचे संसार होत्याचे नव्हते झाले. अजूनही येथील लोकांना कुठून सुरूवात करावी, हेच कळेनासे झाले आहे. तर मागील १५ ते २० दिवसांपासून राज्याचा शेवटचा जिल्हा गडचिरोलीसुध्दा निसर्गचक्राशी झुंज देत आहे. जिल्ह्यातील भागरागड तालुकासुध्दा सावरता सावरेना अशी अवस्था झाली आहे. भामरागड तालुक्यात आधीच रस्ते नव्हते. नदी - नाल्यांनी अनेक गावांची वाट खडतर होती. अशाही परिस्थितीत येथील नागरीक आपले जीवन जगत होते. लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होत होते. मात्र आता होत्याचे नव्हते झाले आहे. रस्ते, पुल वाहून गेले आहेत. पायवाटाही गडप झाल्या आहेत. यामुळे मदत करणारे लोक, आरोग्य यंत्रणा सुध्दा पोहचण्यास अडथळे येत आहेत. या तालुक्याला सावरण्यासाठी अजून  कमीत कमी तीन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. अशा परिस्थितीत या लोकांची कोणत्या उत्सवात सहभागी होण्याची मानसिकता असू शकते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 
पुरपिडीतांमध्ये अनेक राजकारणात सक्रीय लोकही आहेत. त्यांचीही लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याची इच्छा असेल. मात्र या संकटामध्ये आता निवडणूका घेतल्यास निवडणूकांपासून वंचित रहावे लागेल. लोक मतदानासाठीही बाहेर पडणार नाहीत. यामुळे नक्कीच मतांच्या टक्केवारीवर परिणाम पडेल, यामुळे पुरग्रस्तांना सावरू द्या, मगच निवडणूका घ्या, अशी मागणी पुरपिडीतांमधून होत आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-16


Related Photos