महत्वाच्या बातम्या

 आंतरजातीय, आंतरधर्मीय जोडप्यांसाठी राज्यातील पहिले सेफ हाऊस साताऱ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / सातारा : जातीधर्माच्या नावावर स्वत:च्या कुटुंबातील मुला-मुलींचा जोडीदार निवडण्याच्या हक्क डावलला जाण्याच्या घटना आपल्या आजूबाजूला सर्रास घडत असतात. या पार्श्वभूमीवर आंतरजातीय आणि आंतरधर्मीय जोडप्यांना लग्नानंतर सुरुवातीच्या कालखंडात सुरक्षित निवारा देणारे महाराष्ट्रातील पहिले सेफ हाऊस सातारा जिल्ह्यात सुरू करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र अंनिसमार्फत डॉ. हमीद दाभोलकर आणि शंकर कणसे यांनी दिली आहे.

पत्रकात नमूद केले आहे की, गेली अनेक वर्षे महाराष्ट्र अंनिस आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांना पाठबळ देण्याचे काम करत आहे. यामध्ये घरच्या लोकांनी टोकाची भूमिका घेतल्यामुळे अनेक जोडप्यांना सुरुवातीच्या कालखंडात त्यांच्या गावी लगेच जाता येत नाही, तसेच कुटुंबीय आणि समाजाकडून मारहाणीचा, तसेच जिवाचादेखील धोका उद्भवू शकतो, अशा परिस्थितीत त्या जोडप्याला सुरक्षित निवारा देणाऱ्या केंद्राची गरज म्हणून याची उभारणी करण्यात आली आहे. पंजाब, हरयाणासारख्या राज्यांमध्ये राज्य शासनाच्या मदतीने अशी सेफ हाऊस चालवली जातात. याच स्वरूपाचे पहिले सेफ हाऊस सातारा जिल्ह्यात सुरू करण्यात आले आहे.

शासन निर्णयामुळे मिळाले बळ : 
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जानेवारी महिन्यात महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह केलेल्या जोडप्यांना संरक्षण देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करावी, या समितीमार्फत त्यांच्याकडे मदत मागणाऱ्या जोडप्यांना सुरक्षा पुरवण्यात यावी. प्रत्येक जिल्ह्यात अशा जोडप्यांना सुरक्षा निवारा केंद्र उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. या शासन निर्णयामुळे महाअंनिससारख्या सुरक्षा निवारा केंद्र चालवणाऱ्या संस्थेला मोठे बळ मिळणार आहे.

जोडप्यांच्या आधारासाठी अंनिस खंबीर : 
जात ही एक कुठलाही आधार नसलेली अंधश्रद्धा आहे, या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या भूमिकेला अनुसरून हे केंद्र सुरू केले आहे. आंतरजातीय विवाहांच्या माध्यमातून जाती निर्मूलनाचे प्रयत्न करण्याचा हा एक प्रयत्न असल्याचेदेखील यामध्ये नमूद केले आहे. महाराष्ट्र अंनिसमार्फत आज अखेर लावण्यात आलेल्या आंतरजातीय आणि आंतरधर्मीय लग्नामधील जोडप्यांमधील काही लोक या कामी महाअंनिसची मदत करणार आहेत. आंतरजातीय, आंतरधर्मीय लग्न केलेल्या जोडप्यांना येणाऱ्या त्रासाला सामोरे जाण्यासाठी त्यांना मदत मिळावी म्हणून अंनिसमार्फत एक आधार गटदेखील चालू करण्यात आला आहे.

असे सुरू होणार काम : 
आंतरजातीय आणि आंतरधर्मीय लग्न सहायता केंद्र चालवताना अंनिसमार्फत त्या मुला-मुलींची सविस्तर मुलाखत घेऊन त्यांच्याशी संवाद साधला जातो आणि त्यानंतर पोलिसांची मदत घेऊन त्यांचे लग्न लावण्यास मदत करणे आणि गरज पडल्यास त्यांना सुरक्षित निवारा पुरवणे, हे काम केले जाते. हे सुरक्षा निवारा केंद्र पूर्ण मोफत चालवले जाते आणि आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह सहायता केंद्राची मदत हवी असल्यास त्यासाठी महाराष्ट्र अंनिसमार्फत ९९२२३५५४३५ ही मोफत हेल्पलाइनदेखील चालवली जाते, असेदेखील या पत्रकात नमूद केले आहे.

महाराष्ट्र अंनिसचे कार्यकर्ते शंकर कणसे यांच्या जागेत त्यांनी स्वखर्चातून हा सुरक्षा निवारा बांधला आहे आणि महाराष्ट्र अंनिस आणि स्नेह आधार संस्थेमार्फत हा उपक्रम चालवला जाणार आहे. या निवारा केंद्रामुळे आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सुरक्षित निवारा देण्याची व्यवस्था होणार आहे. 





  Print






News - Rajy




Related Photos