चकमकीत ठार झालेला पुरूष नक्षली धानोरा तालुक्यातील तर महिला नक्षली छत्तीसगड राज्यातील रहिवासी


- नक्षलविरोधी मोहिम आणखी तिव्र करणार: पोलिस अधीक्षक बलकवडे
- ४ ते ५ नक्षली जखमी असण्याची शक्यता
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
 प्रतिनिधी / गडचिरोली :
धानोरा तालुक्यातील ग्यारापत्ती पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील नरकसा जंगल परिसरात आज १५ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास चकमक उडाली. या चकमकीत एक महिला आणि एक पुरूष नक्षली ठार झाला. तर या घटनेत ४  ते ५ नक्षली जखमी असल्याची शक्यता पोलिस विभागाने वर्तविली आहे. या घटनेनंतर मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य जप्त करण्यात आले आहे. 
नरकसा जंगलात नक्षली घातपाताच्या इराद्याने एकत्र आले असल्याची गोपनिय माहिती पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना मिळाली. माहितीच्या आधारे सी - ६० पोलिस दलाचे जवान नक्षविरोधी अभियान राबवित असताना २० ते २५ नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल नक्षल्यांना दिशेने गोळीबार केला. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षल्यांनी जंगलात पळ काढला. 
या घटनेत गडचिरोली कंपनी क्रमांक ४ चा पार्टी कमेटी मेंबर लालसु उर्फ शांताराम देवराव गावडे रा. मुरगाव ता. धानोरा व कंपनी क्रमांक ४ ची सदस्य समिला रा. बस्तर एरीया छत्तीसगड या दोन नक्षल्यांचा खात्मा करण्यात आला. या दोघांवर प्रत्येकी ४ लाखांचे बक्षिस होते. चकमकीनंतर शोधमोहिम राबविली असता घटनास्थळी दैनंदिन वापराचे साहित्य, एक कार्बाईन, एक बारा बोअर रायफल, राउंड, भुसुरूंग स्फोट घडवून आणण्याचे साहित्य, दुर्बिन, वाॅकीटाॅकी व ट्रान्झिस्टर आढळून आले. 
सी - ६० च्या जवानांचे या कामगिरीबद्दल पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी कौतुक केले आहे. तसेच विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मोहिम आणखी तिव्र करणार असल्याचे म्हटले आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-15


Related Photos