गडचिरोली महापुराचा अन्वयार्थ


गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षी अतिवृष्टी होते . त्याचे पर्यावसन महापुरात होते.  राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, गावाला जोडणारे व स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीत सुद्धा तयार न झालेले रस्ते बंद पडतात.  हजारो गावांचा संपर्क तुटतो, माती-कौलारूची तकलादू घरे उद्ध्वस्त होतात, रोगराई पसरते कित्येक बालके, माता, वृद्ध दगावतात परंतु बीएसएनएल व्यतिरिक्त मोबाईलचे नेटवर्कच नसल्याने व इंटरनेट सेवा ठप्प पडल्याने सोशल मीडियावर सुद्धा बातम्या येत नाही. मुंबईत किंवा इतर महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटत नाही किंवा कुणाला त्याचे सोयरसुतक असल्याचेही जाणवत नाही.  मात्र जिल्ह्यापासून १२०० किलोमीटर अंतरावरील राजधानीत त्याचा आवाज पोहोचेल तरी कसा?

यावर्षी सातारा, सांगली, कोल्हापूर भागात महापूर आला, सबंध प्रसारमाध्यमांनी त्यास भरभरून लोकांपर्यंत पोहोचवलं पुरात उभे राहून पत्रकाराला ढसाढसा रडताना बघून कित्येकांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या असतील.  परंतु यासारखीच वा त्यापेक्षा भयानक परिस्थिती आज अहेरी, भामरागड, चामोर्शी, मुलचेरा भागात आहे.  यावर्षी तब्बल ७ वेळा महापूराचा तडाखा बसल्याने सुमारे २०० गावं पाण्याखाली गेली आहेत.  १९ मार्ग बंद पडलेत, गडचिरोली जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीची जाण असणाऱ्यांना गडचिरोली जिल्ह्याची लाईफ लाईन गडचिरोली-नागपूर, गडचिरोली-चामोर्शी, आलापल्ली-भामरागड, आष्टी-चंद्रपूर मार्ग बंद पडल्याने प्रशासनाच्या माध्यमातून चाललेले थोडीफार मदतकार्य पोहचवण्यात येणारे अडथळे लक्षात येतील. कोल्हापूर भागात महाराष्ट्रातील जनतेने दाखवलेले मदतीचे औदार्य इकडे कधी पाहावयास मिळत नाही.  दुर्दैवाने यावर्षी सुद्धा नाही. भर पुरात मदत कार्य पोहोचवण्यास गेलेल्या काही कौतुकपात्र व धीरोदात्त युवकांना चार-चार दिवसांपासून अन्नाचा एक कणही न खाल्लेले गावकरी निदर्शनास आलेत. एकीकडे चंद्रयानाच्या संपर्क तुटल्यानंतर हळहळणारा व इस्रो च्या पाठीमागे संपूर्ण ताकदीनिशी उभा राहणारा समाजवर्ग त्यांच्यातीलच एक असणाऱ्या दुर्लक्षित, उपेक्षित व वंचित आदिवासी समाजासोबत या संकटाच्या वेळी उभा राहिलेला दिसत नाही.
गडचिरोली जिल्ह्याला निसर्गाचे अमर्याद वरदान लाभले आहे.  जिल्ह्याचा सुमारे ७६ टक्के भाग वनाच्छादित आहे . गोदावरी, वैनगंगा, वर्धा,प्राणहिता इंद्रावती, पर्लकोटा, पाल, पामुलगौतम, पठाणी या बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत.  परंतु गडचिरोली जिल्ह्यात सिंचनाचा एकही प्रकल्प नाही. वने असल्याकारणाने तो उभारलाही जात नाही.  परंतु राज्याच्या सीमेलगत तेलंगणा सरकारने मेडीगट्टा प्रकल्प उभारला आहे.  स्थानिक जनतेचा प्रचंड विरोध मोडून काढत महाराष्ट्र सरकारने त्यास परवानगी दिली आहे.  त्यामुळे या भागात पूर परिस्थिती भयंकर होण्याची भीती स्थानिकांना आहे. एवढ्या नद्या असून सिंचनपूरक व्यवस्था नसल्याने फक्त खरिप हंगामात भाताचे पीक घेतल्या जाते. या वर्षी संपूर्ण लागवड  झाल्यानंतर पुरामध्ये संपूर्ण पीक वाहून गेले आहे.  रबीचा हंगामच होत नसल्याने अन्य पिकांची शेती नाही.  सोबतच घरातील अन्नधान्य, कपडे, जीवनावश्यक वस्तू, मागासलेपणाचा शिक्का पुसून टाकण्यासाठी सज्ज शाळेतील विद्यार्थ्यांचे वह्या, पुस्तके शालेय साहित्य वाहून गेले आहेत किंवा नासाडी झाली आहे.  घराघरात पाणी घुसल्याने देण्यासाठी वापरले जाणारे लाकडे ओली झाली आहेत. वारा - वावधनाने वीजपुरवठा खंडित झाला आहे.  घरातील चूल बंद आहे.  परिणामी  खायचे वांदे या गोरगरीब आदिवासी जनतेवर आले आहे. घरात पाळलेल्या कोंबड्या, पशुधन पुरात वाहून गेले आहे. जंगल प्रदेश असल्याने सर्पदंश, विंचूदंशाचे प्रमाण अगोदरच जास्त असल्याने त्याची भीती सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
बहुसंख्य भागात पक्के रस्ते नसतानाही १०८ रुग्णवाहिकेची सेवा बऱ्याप्रकारे आहे.  कुपोषण, सिकल सेल, माता व बालमृत्यू मुळे जिल्हा कुप्रसिद्ध आहे, पूरजन्य परिस्थिती असल्याने कोणत्याही वैद्यकीय मदतीविना प्रसवपिडा सहन करत घरामध्ये किंवा ॲम्बुलन्स मध्ये जन्म देण्याच्या घटना झाल्या आहेत. इतर भागातील पुरामध्ये मदतीसाठी राज्याच्या मुंबईपासून अंबेजोगाई वैद्यकीय महाविद्यालयापर्यंतच्या कित्येक डॉक्टरांच्या चमू पोहोचल्या , मात्र आवश्यकतेपेक्षा अधिक डॉक्टर आल्याने त्यांना वापसही पाठवलं गेलं.  परंतु जिल्हा प्रशासनात सेवेत असणाऱ्या केवळ २५ डॉक्टरांच्या एका चमू शिवाय इतर वैद्यकीय मदत सुद्धा या गोरगरीब आदिवासी जनतेला मिळत नाही यापेक्षा दुसरे दुर्भाग्य असू शकते काय?
पूर परिस्थिती फार बिकट आहे कितीही कठीण परिस्थिती व संकटांना सामोरे जाण्याची मानसिकता या जनतेमध्ये आहे. देव बिरसा मुंडा चे वंशज असल्याने तो वारसा त्यांना जन्मजात मिळाला आहे. गावाची पुनर्रचना, पुनर्बांधणी व पुनर्वसन हे येणाऱ्या काळात करावे लागणार आहे. इतिहासात या भागात इतर भागातून मदतीचे लोंढे आले नसल्याने या वेळेस तरी मदत आल्यास सामाजिक एकतेचे एकोप्याचे व बांधिलकीचे संबंध प्रस्थापित करण्याची इतर महाराष्ट्रातील भागाकडे ऐतिहासिक संधी चालून आली आहे, नाहीतरी हे लोकं पुन्हा लढणार आहेत, आपली मातीची घरे उभारणार आहेत व संसारगाडे रुळावर येण्यासाठी पिढ्यानपिढ्या चालत आलेला जन्मसंघर्ष हा पुन्हा करणार आहे. आपण मात्र नक्षली चळवळीच्या बातम्यांव्यतिरिक्त या भागातील लोकांविषयीच्या मानवी संवेदना विसरलेलो आहोत काय या यक्षप्रश्नावर अंतर्मुख होऊन विचार करण्याची आज खरी गरज आहे.

डॉ दीपक मुंढे
माजी वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय अहेरी.
विदर्भ राज्य आंदोलन समिती
सचिव मार्ड संघटना.
८०८७१०८४२३  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-15


Related Photos