गावात आलेल्या निलघोड्याला जंगलात सुखरूप सोडण्यात वनकर्मचाऱ्यांना यश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / आष्टी :
  मार्कंडा कंसोबा गावात भटक्या कुत्र्यांच्या पाठलागामुळे दाखल झालेल्या  निलघोड्याला जंगलात सुखरूप सोडण्यात वनकर्मचाऱ्यांना यश मोठ्या प्रयत्नानंतर यश आले आहे. 
वन्यप्राण्यांच्या प्रजातींवर भटक्‍या कुत्र्यांचा परिणाम होत आहे. निसर्गचक्रात प्रत्येक घटकाची महत्त्वाची भूमिका असते. कळत-नकळत यातील काही घटकांना बाधा झाली तर पूर्ण निसर्गचक्र बिघडून जातं. माणसं आपल्या फायद्यासाठी निसर्गाचे  खूप नुकसान करत आहेत. यात भर म्हणून की काय, अलीकडे भटकी कुत्री सुद्धा वन्यजीवांना धोका निर्माण करत आहेत. भटकी कुत्री सर्रास संरक्षित जंगलांमध्ये जातात आणि वन्यजीवांची शिकार करण्याकरिता वन्यजीवांचा पाठलाग करतात.  त्याला दमवुन - दमवुन शेवटी त्याची शिकार करून टाकतात.  पण कधीकधी हे वन्यप्राणी आपला जिव वाचविण्याच्या  प्रयत्नात जंगल परिसराजवळील गावात येतात.  असाच प्रकार काल १४ सप्टेंबर रोजी चामोर्शी तालुक्यातील चपराळा अभ्यारण्याअंतर्गत येथ असलेल्या मार्कंडा कंसोबा या गावी  पाहावयास मिळाला. काल सकाळी ६ वाजताच्या सुमारास अचानक गावात एक मोठा निलघोडा रस्त्यावर बेभान सैरा - वैरा धावत असताना त्याच्या मागे चार - पाच भटकी कुत्रे पाठलाग  करीत असताना गावकऱ्याना दिसून आले. शेवटी थकुन- थकुन तो जिल्हा परिषद शाळे जवळील पाण्याच्या टाकिजवळ येवून बसला.  याची माहिती चपराळा   चे वनपरिक्षेत्र अधिकारी वन्यजीव मनीष पवार यांना मिळाली. त्यांनी तात्काळ क्षेत्र साहाय्यक एम. एस.गोवर्धन, वनरक्षक कुमेटि, सोनवणे , गोवर्धन , विस्वनाथ मंथनवार व इतर १०  ते १२ वनकर्मचाऱ्यांसह   घटनास्थळी धाव घेतली.   त्याला जंगलाच्या दिशेने नेवुन गावातून हाकलुन लावण्याचा प्रयत्न दिवसभर करत होते. पण तो अंगावर धावून मारण्याचा प्रयत्न करीत होता. त्यामुळे त्याला पकड़ण्याचे  शक्य तितके प्रयत्न करूनही तो सापडत नव्हता . शेवटी तो दमुन शाळेजवळील पाण्याच्या टाकी जवळ येवुन विश्रांती करत स्थिर झाला होता.  त्यामुळे त्या ठिकाणी गावातील बघ्यांची गर्दी पहावयास मिळाली. शेवटी त्याच्या दिर्घ विश्रांतीनंतर  सायंकाळी ६  वाजता च्या सुमारास वनपरिक्षेत्र अधिकारी  मनीष पवार यांच्या आदेशाने वनकर्मचार्यांनी त्याला दोरीच्या साहाय्याने पकडून चपराळा अभयारण्यात दुरवर सुखरूप सोडण्यास यश मिळविले . असा प्रकार पुढे  परत होउ नये यासाठी संरक्षित वनांमध्ये भटक्‍या कुत्र्यांचा वावर थांबला पाहिजे. अभयारण्य परिसरात भटक्‍या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर अंकुश गरजेचे आहे. भटक्‍या कुत्र्यांची ही संख्या वाढत राहिली तर भविष्यात अन्नाच्या शोधात वन्यजीवांसह माणसंही शिकार होतील यात शंका नाही. शासनाकडून वन संवर्धनावर कोट्यवधींचा खर्च होत असताना, भटक्‍या कुत्र्यांच्या गंभीर समस्येकडेही लक्ष देण्याची गरज आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-15


Related Photos