सततच्या पावसामुळे डुम्मे नाल्यावरील अर्धा रपटा गेला वाहून


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
तालुका प्रतिनिधी /  एटापल्ली :
तालुका मुख्यालयापासून २ किमी अंतरावरील डुम्मे नाल्यावरील अर्धा रपटा सततच्या पावसामुळे वाहून गेला असून उर्वरित रपटाही वाहून जाण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेवूनच नाला पार करावा लागत आहे. मात्र नाल्यावर पूल मंजूर करण्याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे.
संततधार पावसामुळे एटापल्ली तालुक्यात अनेकदा पूरपरिस्थिती निर्माण झाली. सततच्या पावसामुळे एटापल्लीपासून २ किमी अंतरावर असलेला डुम्मे नाल्यावरील रपटा अर्धाअधिक वाहून गेला आहे. त्यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह नागरिकांना नाला पार करताना जीव मुठीत घेऊनच पार करावा लागत आहे. याकडे कुणीही लक्ष देत नसल्याने गावातील नागरिकांनी श्रमदानातून नाल्यावरील रपट्याची दुरूस्ती केली. तसेच मोठमोठे दगड टाकून नाल्यातून जाण्यासाठी मार्ग तयार केला. प्रशासन, लोकप्रतिनिधींना अनेकदा निवेदन देवूनही या नाल्यावर पुलाचे बांधकाम करण्यात आलेले नाही. परिणामी पावसाळ्यात नागरिकांना पाण्यातूनच मार्ग काढावा लागतो. या गंभीर बाबीची दखल घेवून शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी राहूल मेश्राम, दौलत दहागावकर, पोला दुर्वा, जोगा मडावी, समरू दुर्वा, पाराळी पुंगाटी, संजय दहागावकर, साईनाथ झाडे व गावातील नागरिकांनी केली आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-15


Related Photos