आदिवासी विद्यार्थीनीच्या जिद्दीला पोलिस शिपाई देणार उभारी!


- येलचिल येथील शैला कुसराम हिचे पोलिस शिपाई नईम शेख यांनी स्वीकारले पालकत्व
- इतर कर्मचाऱ्यांनीही घ्यावी प्रेरणा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्हा अतिदुर्गम, आदिवासी व नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात गुणवत्तेची कमी नाही. मात्र पाहिजे तेवढे पाठबळ मिळत नाही. मात्र होतकरू, गरीब व गरजूंना उभारी मिळण्यासाठी नक्कीच एखादा मदतीचा हात महत्वाचा ठरू शकतो. अशी अनेक उदाहरणे जिल्ह्यात पहावयास मिळतात. अशाच होतकरू, गरीब, आदिवसी विद्यार्थिनीच्या शैक्षणिक आणि क्रीडा भविष्याला उभारी देण्याचा विडा एका पोलिस शिपायाने उचलला आहे. त्यांचे नाव आहे नईम शेख.
अहेरी तालुक्यातील दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येलचिल पोलिस मदत केंद्रात नईम शेख पोलिस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. याच गावातील शैला मंगरू कुसराम ही विद्यार्थिनी आलापल्ली येथील धर्मराव विद्यालयात इयत्ता सहाव्या वर्गात शिक्षण घेत आहे. ती दररोज बसने १४ ते १५ किमीचा प्रवास करून आलापल्ली येथे  शिक्षण पूर्ण करत आहे. शैला हिने पोलिस विभागाने आयोजित केलेल्या २०१८ - १९ च्या गडचिरोली येथील आदिवासी विकास दौडमध्ये भाग घेतला होता. या दौडमध्ये तिने उत्कृष्ट कामगिरी केली. यामुळे तिचा पोलिस विभागातील वरीष्ठ अधिकाऱ्यांकडून गौरव करण्यात आला. तिच्या या कामगिरीने पोलिस शिपाई नईम शेखसुध्दा प्रेरीत झाले. तिच्या पंखांना बळ देण्याचे त्यांनी ठरविले आणि तिचे पालकत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला. 
शैलाच्या भविष्यातील शिक्षणाची आणि खेळातील तिच्या कौशल्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा निर्णय नईम शेख यांनी घेतला आहे. शैलाच्या शिक्षणासाठी लागणारे बुक, पुस्तके, गणवेश, बुट तसेच इतर साहित्य तिला उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामुळे शैला च्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे.  भविष्यात तिच्या उच्च शिक्षणासाठी पूर्ण ताकदीने सहकार्य करणार असे, नईम शेख यांनी विदर्भ न्यूज एक्सप्रेसशी बोलतांना सांगितले. 
जिल्ह्यातील दुर्गम भागातील शिक्षणात आणि खेळात रूची असलेल्या विद्यार्थ्यांना आधाराची गरज आहे. यामुळे प्रत्येक शासकीय कर्मचार्याने आपल्या परीने दुर्गम, आदिवासी भागातील एका तरी गरजूचे पालकत्व स्वीकारल्यास नक्कीच समाधान मिळेल आणि होतकरू पुढे जाउ शकेल, असेही मत पोलिस शिपाई नईम शेख यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या या कार्याला विदर्भ न्यूज एक्सप्रेसकडून खुप - खुप शुभेच्छा! 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-14


Related Photos