आष्टीचे पोलिस निरीक्षक रजनीश निर्मल यांच्या प्रयत्नातून वृद्ध दाम्पत्यास मिळाला निवारा


- थाटात केले वास्तुपूजन 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / आष्टी :
  खाकी वर्दीतील माणूस समाजाचे रक्षण करण्यासोबतच सामाजिक भान राखत निराधाराला आधार सुद्धा देऊ शकतो हे आष्टीचे ठाणेदार रजनीश निर्मल यांनी दाखवून दिले आहे. त्यांच्या प्रयत्नाने एका वृद्ध दाम्पत्याला हक्काचा आणि पक्का निवारा मिळाला आहे. यामुळे या वर्दीतल्या माणसाच्या माणुसकीबद्दल सर्वत्र आदर व्यक्त केला जात आहे. 
चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा (कं) येथील मुरलीधर आकुलवार व त्यांच्या पत्नी  सिंधुबाई आकुलवार (सेवानिवृत्त शिक्षिका) हे दाम्पत्य  गेल्या ५० वर्षापासून  मार्कंडा (कं) येथे स्वतः बांधलेल्या घरामध्ये वास्तव्य करीत होते.  मात्र ३  वर्षांपूर्वी त्यांचे घर पावसामुळे पडले होते. तरीही  हे दाम्पत्य एक लहानशी झोपडी बांधून दिवसभर वास्तव्य करून रात्रीच्या  वेळी घराजवळील मंदिरात आश्रय घेत होते. त्यांच्या  या हालाकीच्या परिस्थिबद्दल आष्टीचे सामाजिक कार्यकर्ता  संजय  पंदिलवार यांनी ऑगस्ट २०१९ मधे आष्टी पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक  रजनीश निर्मल यांना माहिती दिली.  यानंतर ठाणेदार निर्मल यांनी ६ ऑगस्ट  रोजी   मार्कंडा (कं) येथे ते वास्तव्य करीत असलेल्या घरी जाऊन भेट घेतली व परिस्थिती जाणून घेतली.  मागील ३ वर्षापूर्वी घर पडल्यानंतर ग्रा प मार्कंडा (कं) येथे इंदिरा आवास योजने अंतर्गत मिळणाऱ्या घरकुलासाठी अर्ज सादर केला.   पण त्या अर्जाचा कसल्याही प्रकारे विचार करण्यात आला नाही.  त्यामुळे आम्हाला सदर योजनेचा लाभ मिळाला नाही,  अशी धक्कादायक माहिती सदर जोडप्याने दिली.  याबाबत पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांनी ८ ऑगस्ट रोजी पोलिस अधीक्षक  शैलैश बलकवडे, अप्पर पोलिस अधीक्षक गडचिरोली (प्रशासन)  मोहित कुमार गर्ग,  अहेरी  चे अप्पर पोलिस अधीक्षक  मनीष कवालनिया, अहेरी चे उपविभागीय पोलिस अधिकारी  बजरंग देसाई यांच्याशी चर्चा केली  आणि त्यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनातुन नवीन घराचे बांधकाम करण्यास सुरुवात करण्यात आले. या घराच्या बांधकामासाठी लागणारा  निधी सामाजिक कार्यकर्ता संजय पंदिलवार व आष्टी पोलिस स्टेशन चे अधिकारी व कर्मचारी यांनी स्वखुशीने आपापल्या मासिक पगारातून  गोळा केला.  या निधीतून सुंदर घरांचे बांधकाम   २८ दिवसात   पूर्ण करण्यात आले. सोबतच त्यांना स्वयंपाकासाठी लागणारे साहित्य , तसेस फर्निचर ,पडदे इत्यादि साहित्य पुरवठा करुण त्या घराचे काल १३ सप्टेंबर रोजी  रितसर  वास्तुपूजन  करण्यात आले. 
 आष्टी  पोलिस ठाण्याच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  घर बांधकाम करण्याकरिता मदत करणारे विनोद गौरकार, सतीश चिप्पावार,  गुरु जयपुरकर, पेद्दीवार, अलोक मंडल यांचा  अप्पर पोलिस अधीक्षक  मनीष कवालनिया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  तसेच या कार्यक्रमास   अप्पर पोलिस अधीक्षक  मनीष कवालनिया,  डॉ प्रभाकर पंदिलवार, दिवाकर कुंदोजवार , संजय  पंदिलवार, पोलिस निरीक्षक रजनीश निर्मल, पोलिस उपनिरीक्षक जयदीप पाटिल व पोलिस कर्मचारी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.    Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-14


Related Photos